विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या गुरेवाडी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धेत जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरावर निवड झालेल्या नान्नज केंद्रातील गुरेवाडी शाळेतल्या ३ गुणव़ंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह बांधखडक शाळेला शनिवार दि.४जानेवारी २०२४ रोजी सदीच्छा भेट दिली.
यावेळी बालसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.चि.हर्ष पोपट कोरडे इ.२री या विद्यार्थ्याने स्वत: तबला वाजवत ‘टाळ बोले चिपळीला….’ हा अभंग उत्कृष्टरित्या सादर केला,तर कु.योगिता पोपट कोरडे इ.४थी हिने स्वत: हार्मोनियम वाजवून भक्तिगीत गायले.आपल्याच वयाच्या चिमुकल्यांनी स्वत: पेटी-तबला वाजवत केलेल्या अत्युत्कृष्ट गायन कलेला बांधखडक शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटासह उत्स्फूर्त दाद दिला.
तसेच कु.मिदहत इसराईल शेख इ.१ली या विद्यार्थीनीने ‘माझे वडील’ या विषयावर तब्बल ६ मिनिटे अस्खलित भाषण करून सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमानंतर विविध गुणदर्शन स्पर्धेत वक्तृत्व व वैयक्तिक गायन स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरावर निवड झालेल्या या तीनही विद्यार्थ्यांसह गुरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दादा राऊत सर,समवेत आलेले पालक भिमराव कोरडे व तबलावादक सोमिनाथ सुपेकर या सर्वांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात येऊन दि.११जानेवारी रोजी अहिल्यानगर येथे संपन्न होणा-या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
बालसंगीत मैफिलीच्या कार्यक्रमाचा उद्देश प्रस्तावनेतून मनोहर इनामदार सरांनी मांडला, तर आभार प्रदर्शन मुख्या. विकास सौने सरांनी केले.