जामखेड न्युज – –
राज्यात गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं होतं. राज्यातील सातारा, सागंली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि इ. जिल्ह्यांमध्ये पावसाने प्रचंड नुकसान केलं. पावसाचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं होतं त्यामुळे त्यांच्या घरात आता चिखल आणि घाणीचं साम्राज्य असलेलं पाहायला मिळत आहे. तर व्यापारांच्या दुकानातील सामानाचंही नुकसान झालं आहे. अशातच राज्य सरकारने लोकांसाठी मदतीची घोषणा केली आहे.
ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून आणि चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटंबास दिले जाणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे.