तालुक्यातील सारोळा, जमादारवाडी, जामखेड शहर परिसरातून विद्युत मोटारी चोरी गेल्याच्या अनेक तक्रारी आहेत. गेल्या महिन्यापासून विद्युत मोटार चोरांचा सुळसुळाट झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी या चोरांनी चोरून नेल्या आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरांचा जामखेड तालुका पोलिस स्टेशनने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
विद्युत मोटारीची किंमत हाँस्पॉवर नुसार वीस हजारापासून पन्नास हजारांपर्यंत आहे. शेतात विहीर, बोअरवेल येथे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोटारी आहेत. रात्रीच्या वेळी शेतात कोणी नाही याचा अंदाज घेऊन चोर चोरी करत आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
विद्युत मोटार, पानबुडी मोटार, पाईप, केबल, स्टार्टर फ्युज अशा वस्तूंवर चोर डल्ला मारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश आजबे यांच्या सारोळा तसेच शंभूराजे कुस्ती तालीम येथील विद्युत मोटार चोरी गेलेल्या आहेत तसेच जमादारवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी गेलेल्या आहेत.
सारोळा, जमादारवाडी, जामखेड तसेच अनेक ग्रामीण भागातील विद्युत मोटारी चोरी गेलेल्या आहेत. पोलिसांनी ताबडतोब या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
विद्युत मोटर चोर मोटारी चोरून त्यातील तार काढून बाजारात विकून पैसे कमवत असल्याचा गोरख धंदा करत असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी तत्काळ पैसे उपलब्ध करून विद्युत मोटारी खरेदी कराव्या लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले. या चोरांचा जामखेड पोलिस स्टेशनने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.