जामखेड न्युज——
“शेतकऱ्यांच्या स्वप्नांना नवी उभारी”
कृषिदूतांचे ‘राजुरी’ गावात आगमन शेती प्रगतीसाठी नवी पहाट
राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत
हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ‘ग्रामीण कृषि जागरूकता’ व ‘कृषि औद्यागिक कार्यानुभव उपक्रम २०२४-२५’ या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जामखेड तालुक्यातील राजुरी येथे दाखल झाले आहेत. २४ आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविली जाणार आहेत.
कृषिदूतांनी राजुरी ग्रामपंचायतीस व कृषि सेवा केंद्रास भेट दिली. यावेळी माननीय सरपंच सागर कोल्हे, उपसरपंच नानासाहेब खाडे, ग्रामसेवक एकशिंगे व इतर सदस्य, मल्हारी गायकवाड, अविनाश सुतार, भरत लटपटे, नितीन काळदाते व इतर ग्रामस्थांनी कृषिदूतांचे स्वागत केले.
कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकावर आधारित उपक्रम राबविला जातो.
या दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या
अडचणी, शेतकऱ्यांचे जीवनमान,त्यांचा सामाजिक-आर्थिक स्तर, संबंधित गावातील पीक पद्धती,अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा आहेत. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग, व्यवसाय व इतर हवामान विषयी जास्तीत जास्त माहिती विविध ॲपद्वारे संपादित करता येईल, तसेच ई-पिक पाहणी याबाबत विद्यार्थी गावात मार्गदर्शन करणार आहेत. कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषिदूत कृषि आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख प्रा. पोपट पवार, अधिष्ठाता प्रतिनिधी डाॅ. नजिर तांबोळी, कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास मेहेत्रे व इतर विषय विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रमातून महाविद्यालयाचे कृषिदुत सौरभ चव्हाण,आदित्य बोडके, सर्वेश कानडे व आर्यन देशमुख मार्गदर्शन करतील.