राज ठाकरेंना मनोज जरांगे पाटील यांनी सुनावलं,”माझ्या नादी लागू नका नाही तर…”
मागील काही प्रचारसभांममधून मराठा आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मराठा आरक्षण कसे मिळणार हे मनोज जरांगे यांनाही सांगता आले नाही, असे राज यांनी म्हटले होते. आता, त्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समाजाला आदेश दिला तर तुम्हाला गोळ्या सुरू कराव्या लागतील असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे आता विविध जिल्ह्यांच्या भेटीवर आहेत. जरांगे हे सध्या बीड जिल्ह्यात आहेत. बुधवारी बीड जिल्ह्यातील टाकरवण येथे गाव भेटीवर जरांगे पाटील आले होते.
त्यांनी म्हटले की, “माझ्या नादाला लागू नका. नादी लागला, तर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. मी अजून माझ्या समाजाला काहीच सांगितले नाही. समाजाला आदेश दिला, तर तुम्हाला गोळ्या सुरू करायची वेळ येईल”, असा पलटवार जरांगे यांनी राज ठाकरेंवर केला.
त्यासाठी कोट्यवधी मराठ्यांना अडचणीत आणणार नाही…
राज ठाकरे यांनी प्रचार सभेत बोलताना, ‘पाडापाडी करायची तर करा, समाजाला कसे आरक्षण मिळवून देणार?’ असा सवाल उपस्थित केला होता. याला प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी म्हटले, “आम्हाला राजकारणाचे काही देणेघेणे नाही. आमचा आरक्षण मागणीचा लढा सुरूच राहील. मी राज ठाकरेंना टाकरवण येथून आव्हान करतो माझ्या नादी लागू नका”. “निवडणुकीतून माघार घेतली म्हणून काय वाईट झाले? मराठा समाजाचे काम करतो, दीडशे उमेदवारांचे काम करत नाही. कोट्यवधी मराठ्यांना अडचणीत आणणार नाही,” असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलकांचे इतर समाज घटकासोबतचे उमेदवार उभे राहणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. जरांगे यांनी काही मतदारसंघाची घोषणा केली होती. मात्र, एका दिवसानंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. जरांगे यांच्या निर्णयाची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.