जामखेड न्युज——
सुजय विखेंच्या मंचावर जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, सभा उधळली, जाळपोळ व गाव बंद
जयश्री थोरात यांच्याबद्दल विखे समर्थकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महिलांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. या सभेत अध्यक्षस्थानी असलेल्या वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गावातील संतप्त महिलांनी ही सभा उधळून लावली. यानंतर गोंधळ झाला. संतप्त जमावाने दगडफेक, जाळपोळ केली.
याचबरोबर वसंतराव देशमुख यांनी महिलांचा अत्यंत अवमानकारक उल्लेख करून समस्त महिला भगिनींचा अपमान केला आहे. यामुळे सभेमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. हे ऐकताच धांदरफळ गावांमधील अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सभास्थळी धाव घेतली.
सुजय विखेही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप या वेळी महिलांनी केला. याप्रसंगी विखे यांनी भाषण आटोपते घेतले. तसेच देशमुख यांनाही भाषण संपवण्यास सांगितले. सर्वत्र गंभीर वातावरण झाले असताना सभा संपवून तातडीने निघत असताना महिलांनी सुजय विखे आणि देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोंधळ उडाला.
विखेंच्या ताफ्यातील गाडी पेटवली, दगडफेक केली
सभा उधळल्यानंतर संतप्त लोकांनी एक गाडी फोडल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार घडल्यानंतर विखे यांच्यासमवेत लोणीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या संगमनेर तालुक्यातील तरुणांनी अडवल्या. या वेळी संगमनेर तालुक्यातील युवक व राहाता तालुक्यातील व लोणी परिसरातील युवकांमध्ये बाचाबाची निर्माण होऊन तणावपूर्ण वातावरण झाले आहे. सभेत गोंधळ घातला म्हणून विखे समर्थक संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जमले होते.
वसंत देशमुख यांचं ते विधान-
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यासभेत सुजय विखे मंचावर असताना भाजपचे वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. आपल्या कन्येला समजवा…नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे, असं वक्तव्य वसंत देशमुख यांनी केले. वसंत देशमुखांच्या या विधानानंतर संगमनेरमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
धांदरफळ गाव बंद ठेऊन निषेध-
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सुजय विखेच्या सभेत धांदरफळ गावातीलच वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होतोय. काल रात्रीच्या जाळपोळच्या घटनेनंतर आता तालुक्यातील परिस्थित नियंत्रणात आहे.
धांदरफळ गावामध्ये काल रात्री मोठा गोंधळ झाल्यानंतर सभा स्थळावरील सुजय विखे पाटलांच्या युवा संकल्प मेळाव्याचे बँनर थोरात समर्थकांकडून निषेध फाडले गेले होते आणि त्याचबरोबर जयश्री थोरात यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत धांदरफळ गाव बंद ठेवण्यात आलं आहे.