जामखेड न्युज———
जामखेड तालुक्यातील या गावातील आवडत्या शिक्षकाची बदली झाल्याने निरोप देताना विद्यार्थी गहिवरले
उपक्रमशील शिक्षक अनंता गायकवाड यांचा निरोप समारंभ संपन्न

विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते घट्ट असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ हा शिक्षकांच्या सहवासातच जात असतो. आपल्या कलागुणांनी काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण करतात. असाच अनुभव जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी येथे आला.

उपक्रमशील व आवडते शिक्षक श्री.अनंता गायकवाड सर यांची बदली झाली.शाळेच्या वतीने त्यांना निरोप देताना सर्व विद्यार्थी गहिवरले. उपस्थित पालक व शिक्षक यांनाही आश्रू अनावर झाले.

2017 ते 2024 या कार्यकाळातअत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्यनिष्ठा जोपासली.दुर्मिळ व पारंपारिक असलेली झांजपथक कला विद्यार्थ्यांमध्ये रुजविली. शिवजयंती, राष्ट्रीय सण, महापुरुषांचा जयंती सोहळा व पंचक्रोशीतील उत्सवात झांजपथक व लेझिमपथकाचे सादरिकरण श्री.गायकवाड सरांनी केले.मुख्याध्यापक पदभार सांभाळत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण दिले.

पालक,शिक्षक व प्रशासन यांचा उत्तम समन्वय ठेवत तेलंगशी शाळेत अनेक उपक्रम राबविले.यावेळी गायकवाड सरांनी शाळेतील विविध आठवणींना उजाळा दिला. त्यांनी भावुक होऊन शाळा सोडून जाताना सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा मौलिक संदेश दिला.

आज तेलंगशी शाळेत अनंता गायकवाड सर यांच्या निरोप समारंभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे हे होते.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवननाथ ढाळे,मुकेश मोरे,अमोल शिरोळे,भागवत कोठुळे,रामदास जाधव यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी श्री.गायकवाड सर यांचा छञपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा देऊन आदरपूर्वक सन्मान केला.

सर्वांनीच त्यांच्या कार्याचे भरभरुन कौतुक केले.आवडत्या शिक्षकाला निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले होते.यावेळी सरांनी सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न दिले. विद्यार्थ्यांमध्ये सुमित ढाळे,गणेश जायभाय,प्रितम ढाळे व यशश्री जायभाय यांच्यासह संतोष गोरे सर,सुशेन चेंटमपल्ले सर,विजयकुमार रेणुके सर,श्रीम.लक्ष्मी जायभाय मॅडम,अशोक जाधव सर,रविंद्र धस सर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष गोरे सर यांनी केले.सूञसंचलन श्री.विजयकुमार रेणुके सर तर आभारप्रदर्शन श्री.रविंद्र धस सर यांनी मानले.


