राज्यभरातील महिला अत्याचाराच्या घटनेचा कर्जत-जामखेडकरांकडून निषेध व्यक्त

0
205

जामखेड न्युज——–

राज्यभरातील महिला अत्याचाराच्या घटनेचा कर्जत-जामखेडकरांकडून निषेध व्यक्त


राज्यभरातील महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज कर्जत-जामखेडमध्ये नागरिकांकडून निषेध आंदोलन करण्यात आले. मतदारसंघातील कर्जत शहर, जामखेड शहर , मिरजगाव आणि राशीन या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांनी तोंडाला काळी रिबीन बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन या घटनेचा आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्रात गेल्या २ वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता बालक-महिला सुरक्षित नाहीत. या अत्याचाराच्या घटनेतून अगदी अडीच-तीन वर्षांच्या चिमुकल्याही सुटल्या नाहीत. गेल्या दहा दिवसात बदलापूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, अकोला असा राज्यातील विविध ठिकाणी अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत, त्यामुळे घरातील मुलींना बाहेर जाऊ द्यायचं की नाही असा प्रश्न प्रत्येक कुटुंबाला आज पडला आहे.

मात्र राज्य सरकारची भूमिका या अत्याचारा विरोधात स्पष्ट दिसत नाही. कारवाई करण्यात वारंवार दिरंगाई होत असल्याने असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे राज्यसरकारचा महिला सुरक्षेचा दावा पोकळ ठरत आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नसल्याने महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

ज्या महाराष्ट्रात लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा म्हणून मुलींची पूजा केली जाते, जो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या राजमाता माँ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा महान व्यक्तीमत्त्वांच्या नावाने ओळखला जातो त्या महाराष्ट्रात आज मुली सुरक्षित नाहीत, ही सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

महाराष्ट्रात यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात मुलींवर अत्याचार झालेले नाहीत. कायद्याचा धाक नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, महिला व मुली असुरक्षित आहेत आणि सरकार मात्र स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी ‘लाडक्या’ योजनांमध्ये व्यस्त आहे. आज महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मतदारसंघातील कर्जत शहर, जामखेड शहर, मिरजगाव आणि राशीनमध्ये नागरिकांनी तोंडाला काळ्या फीती बांधून हातात काळे झेंडे घेऊन कडकडीत बंद पाळून मूक आंदोलन केले. महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच मतदारसंघातील कोणत्याही महिलेवर किंवा चिमुकलीवर असा वाईट प्रसंग येऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसे निवेदन पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्जत-जामखेडमधील नागरिक सहभागी झाले होते.

“राज्यभरात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी उस्फुर्तपणे बंद पाळला. यामध्ये पक्षभेद विसरून सगळे नागरिक सहभागी झाले होते. यावरून एक गोष्ट लक्षात येते की राज्यात जर कोणावर अन्याय होत असेल तर त्याविरोधात स्वाभिमानी जनता कोणालाही न घाबरता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही. सध्याचे राज्यकर्ते हे गुंडाना बळ देत चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत असले तरीही जनतेच्या रेट्यापुढे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही.”

रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here