पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी योग्य आहार व  त्याचे फायदे 

0
268
जामखेड न्युज – – – 
आजकालची बैठी, धावपळीची स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण अशी जीवनशैली आहे. यामुळे वाढणारे वजन किंवा स्थूलता आणि सध्या सुरु असलेला पावसाळा ऋतु, या पावसाळी हवेमध्ये आपल्या खाण्यापिण्यात व्यायामात कोणते बदल करावे आणि या बदलांमुळे वजन कमी होऊन शरीराला कोणते फायदे मिळू शकतात या विषयी माहिती घेऊ.
आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या म्हणजेच ऋतू प्रमाणे आपले खाणे, पिणे, झोप, व्यायाम असावं असं सांगितलं आहे. कारण जे ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजेच सृष्टीतील वातावरणामध्ये जसे बदल होत असतात त्याप्रमाणेच शरीरात सुद्धा बदल होत असतात. या वर्षाऋतूमध्ये शरीरातील वात दोष वाढतो आणि पित्ताची संचिती होऊ लागते. मग अशा बदलांमुळे स्थूल व्यक्तीमध्ये जास्तीचे असणारे वजन यामुळे गुडघेदुखी, टाचदुखी किंवा पचनाच्या तक्रारी, गॅसेस, बद्धकोष्ठता अशा समस्या डोके वर काढू लागतात.
*कोणता आहार कसा घ्यावा?*
पाणी – रोज उकळून थंड केलेले पाणी प्यावे. शक्य झाल्यास गरम पाण्याचे सेवन दिवसभरात तहान जशी लागेल तसे करावे. याचा वजन कमी होण्यासाठी चांगला फायदा होतो. तसेच जेवणानंतर अर्धा ते पाऊण तासानंतर पाणी प्यावे. जेवण्याच्यामध्ये थोडे थोडे घोटभर माफक पाणी प्यावे. थोडक्यात जर जेवण झाल्या झाल्या लगेच पाणी प्यायले तर वजन, स्थूलता वाढते म्हणून हे टाळावे.
आयुर्वेदाप्रमाणे मधुर, अम्ल, लवण, स्निग्ध गुणांनी युक्त पचण्यास हलका आणि उष्ण आहार घेण्यास सांगितलं आहे. फक्त स्थूल व्यक्तींनी गोड पदार्थ  म्हणजे साखर, दूध व दुधापासून बनलेले व कफकारक तत्सम पचण्यास जड पदार्थ अजिबात घेऊ नयेत. (उदा. पेढा बर्फी, पनीर, बासुंदी, दही, श्रीखंड गुलाबजाम, रसमलाई, रसगुल्ला इत्यादी)
सकाळी लवकर उठून तीळतेल किंवा करंज तेल सर्वांगास लावून काही आयुर्वेदिक वनस्पतींचे चूर्ण उटणे म्हणून वापरून गरम पाण्याने स्नान केल्यास अतिरिक्त मेद झडण्यासाठी मदत होते. नित्यनियमाने सूर्यनमस्कार काही ठराविक योगासने  करावीत किंवा चालण्याचा व्यायाम करावा. या ऋतूमध्ये शरीरबल कमी असल्याने माफक हलका किंवा अर्धशक्ती व्यायाम करावा.
1) सकाळी चहाऐवजी काही पेय घ्यावी. आपल्या हाताच्या बोटाच्या पेरा एवढे हळकुंड, दालचिनी व आले ठेचून याचा ३ कप पाणी घालून उकळून १ कप आटवून गाळून उपाशीपोटी घ्यावे. यामुळे अग्नी प्रदीप्त होण्यासाठी चांगली भूक व पचनासाठी, वजन कमी होण्यासाठी, जंतुसंसर्ग टाळण्यासाठी उपयोग होतो.
2) तसेच 2 चमचे जिरे + 2 कप पाणी उकळवून १ कप करावे व गरम असताना घोट घोट घ्यावे यातील जिरे चावून खावे.
3) कोरफड रस + आवळा रस 2-2 चमचे, अर्धा ग्लास कोमट पाणी, 6-8 थेम्ब लिंबूरस व 1 चमचा मध घालून घ्यावे या सोबतच  अश्वगंधा च्या पानांचा रस खास वजन कमी होण्यासाठी घेऊ शकतो पण हा फार दिवस सलग घेऊ नये असे वर्णन आयुर्वेदात केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here