जामखेड न्युज——
वीस वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाचे मानसिक त्रासाने अल्पशा आजाराने निधन
कर्जत परिसरात शोककळा

गेल्या वीस वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावरच काम करणाऱ्या कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील शिक्षकास शाळेस चाळीस टक्के अनुदान असतानाही शासकीय गलथान पणा तसेच कागदपत्रांची त्रुटी व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी नसल्याने संभाजी घालमे यांचे मानसिक तणावामुळे अल्पशा आजाराने निधन झाले यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. लवकरात लवकर शाळांना अनुदान द्यावे व शिक्षक भरती करावी अशी मागणी होत आहे.

नुतन मराठी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कुळधरण ता कर्जत जि अहमदनगर या उच्च माध्यमिक विद्यालयातील इतिहास शिक्षक श्री संभाजी जाणू घालमे यांचे आज निधन झाले. गेल्या 20 वर्षापासून ते विनाअनुदानित तत्वावर काम करत होते सध्या 40% अनुदानित असुन सुद्धा फक्त कागदपत्रांची त्रुटी व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी नसल्याने आज त्यांना बिनपगारी च या जीवनाचा निरोप घ्यावा लागला. आता याला जबाबदार कोण ? असेच कितीतरी बांधव आपल्याला अर्ध्यावर सोडून गेले आहे.

चांगले शिक्षण घेतले म्हणजे नोकरी लागेल, कुटुंबाचा आई वडिलांचा आधार बनू या आशेने अनेकजण मिळेल ती नोकरी पत्करतात काही दिवसात अनुदान येईल या आशेने विनाअनुदानित शाळेत काम सुरू करतात पण आयुषभर अनुदान मिळत नाही. यातच अनेक आत्महत्या होतात अनेकांना विनाअनुदानित तत्वावरच मरण पत्कारावे लागते ही आपल्या राज्यकर्त्यांची शोकांतिका आहे.

शिक्षक घ्यायचे बीएड, डीएड करायचे आयुष्याची वीस पंचवीस वर्षे शिक्षणात घालायची नोकरी च्या मागे लागत कुठे तरी विनाअनुदानित शाळेवर काम करायचे आणि शेवटी विनाअनुदानित म्हणूनच आयुष्य भर काम करायचे तर शिक्षणाचा काय उपयोग कुटुंब कसे चालवायचे म्हतारपणी आई वडिलांना आधार कसा द्यायचा यातच मानसिक तणावामुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. शासनाने विनाअनुदानित तत्व रद्द करून शिक्षक भरती करावी अशी मागणी होत आहे.

शिक्षक उपाशी शासन तुपाशी,अजुन किती दिवस फुकट काम करायला लावता, वेतनाच्या प्रतीक्षेत आतापर्यंत कितीतरी आत्महत्या झाल्या, अजून किती होऊ देणार असा प्रश्न विनाअनुदानित शिक्षक विचारत आहेत






