जामखेड न्युज——
धाराशिवमध्ये मतदानाला रक्तरंजित गालबोट, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पाटसांगवी (ता. भूम) या गावात मतदानाच्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास एकाचा भोसकून खून करण्यात आला. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात असून, खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव समाधान पाटील असे आहे. ते ठाकरे गटाचे असल्याचे सांगितले जात आहे. खुनाचे कारण वैयक्तिक की राजकीय याचा शोध पोलीस घेत आहेत.
भोसकणारा आणि ज्याचा खून झाला ते नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. पाटसांगवी येथील मतदान केंद्राजवळ शिंदे गटाच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर चाकूने हल्ला केला. त्यात समाधान पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ठाकरे गटाचे अन्य तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्या सर्वांना बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे डॉक्टरांनी समाधान पाटील यांना मृत घोषित केले. अन्य कार्यकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर गावात तणाव निर्माण झाला. काहीवेळ मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा मोठ्या संख्येने दाखल झाला. त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले. हल्लेखोर फरार झाल्याचे सांगितले जात आहे.
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. भूम, परंडा तालुक्यांत महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी प्रामुख्याने पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेना शिंदे गटाचे दत्ताअण्णा साळुंके यांच्यावर सोपवण्यात आली होती.
महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आदींनी सांभाळली. या मतदारसंघात हाय होल्टेज लढत असतानाही प्रचारादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पाटसांगवी येथील खुनाच्या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले समाधान पाटील हे अन्य काही कार्यकर्त्यांसह उभे होते. त्यावेळी तेथे शिंदे गटाचे 20 ते 22 कार्यकर्ते आले. त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून बाचाबाची सुरू झाली. त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या मारहाणीत चाकूचा वापर केला. समाधान पाटील यांना एकाने चाकून भोसकले. ते रक्तबंबाळ होऊन खाली पडले. त्यांच्यासोबतच अन्य तीन ते चार कार्यकर्तेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हल्लेखोर फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पंचनामा करण्यात आला असून, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जखमींना दाखल करण्यात आलेली बार्शी येथील रुग्णालयात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी भेट दिली. मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.