जामखेड न्युज——
संत तुकाराम साहित्य पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे.-इंद्रजीत भालेराव
जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानने राज्यस्तरीय संत तुकाराम साहित्य पुरस्कार माझ्या वाड्:मयीन कार्यासाठी देऊन माझा गौरव केला आहे.हा पुरस्कार जगद्गुरु संत तुकारामांच्या नावाचा असल्याने आजवर मला मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा लाखमोलाचा वाटतो असे विचार सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षी लेखक कवींच्या वाड्:मयीन कार्यासाठी संत तुकाराम पुरस्कार दिला जातो. दहा हजार रुपये रोख,मानचिन्ह,सन्मानपत्र व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.यावर्षीचे पुरस्काराचे पाचवे वर्ष आहे.जामखेड येथे आल्यानंतर कवी भालेराव यांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी आ.य.पवार व प्रा.मधुकर राळेभात यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यानंतर कन्या विद्यालयाच्या प्रांगणात शालेय समितीचे सदस्य सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणाचा समारंभ झाला.कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात यांनी केले.कन्या विद्यालयाच्या प्राचार्य कुसूम चौधरी यांनी शाल श्रीफळ देऊन भालेराव यांचा सत्कार केला.प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रा.भालेराव यांना संत तुकाराम साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भालेराव यांच्या कवितांना श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली.बाप,गावाकडे चल माझ्या दोस्ता या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.प्रा.मोहन डुचे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास डॉ.विद्या काशीद कवी रंगनाथ राळेभात,कुंडल राळेभात,प्रा.राहुल भाकरे,प्रा. शत्रुघ्न कदम, आर.टी.साखरे,विनायक राऊत, अवधूत पवार,डॉ.जतीन काजळे,प्रकाश सदाफुले, दत्तात्रय सोले,मोहन पवार प्राचार्य मडके, कन्या विद्यालयाचा स्टाफ व पत्रकार उपस्थित होते.