जामखेड न्युज——
चौंडीत आ. रोहित पवार व पार्थ पवार आमनेसामने
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडीत आज आमदार रोहित पवार व युवा नेते पार्थ पवार आमनेसामने येत आहेत. आ. पवार विविध विकास कामांचे भूमीपूजन तसेच दुसऱ्या टप्प्यातील युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभ चौंडीतून करत आहेत यासाठी जंगी तयारी सुरु आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या दिपावली फराळासाठी येत आहेत. यामुळे पवारांची तिसरी पिढी आज चौंडीत आमनेसामने येत आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी ता. जामखेड येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या विविध कोट्यवधींच्या विकासकामांचे दि.16 नोव्हेंबर (गुरुवार) रोजी संध्याकाळी 4 वाजता भूमिपूजन पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज युवराज भूषण सिंह होळकर, संसदरत्न खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीम. सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री मा अनिलजी देशमुख साहेब, काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजीत कदम साहेब, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे असे दिग्गज मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी युवा संघर्ष पदयात्रेची देखील पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.
आमदार प्रा. राम शिंदे हे दरवर्षी दिपावली निमित्त फराळाचे आयोजन करत असतात यासाठी मोठ्या प्रमाणावर नेते व कार्यकर्ते येतात यावर्षी आमदार शिंदे यांनी पार्थ पवार यांना खास निमंत्रित केले आहे. यामुळे दोन्ही पवार चौंडीत आमनेसामने येत आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी 2 कोटी तीन लाख व सीना नदीवरील पश्चिम घाट बांधकामासाठी 4 कोटी 99 लाख निधी मंजूर करण्यात आला होता व आता संग्रहालय बांधकामासाठी तीन कोटी रुपये, नदीकाठी घाटाचे बांधकाम व सुशोभिकरण 2.5 कोटी रुपये व
दोन भव्य मोठ्या कमानी बांधकाम 1.5 कोटी रुपये असा सात कोटी रुपये असे एकूण 14 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चौंडी येथे संपन्न होत आहे.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आजबे यांनी केले आहे.
या दोन्ही कार्यक्रमाशिवाय धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण तसेच धनगर समाजाच्या वतीने नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.
आज चौंडीत आमदार प्रा. राम शिंदे यांचा दिपावली फराळ, आमदार रोहित पवार यांचे विविध विकास कामांचे भूमीपूजन तसेच युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभ याच बरोबर यशवंत सेनेचे आमरण उपोषण यामुळे आज चौंडीत मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे.