जामखेड न्युज——
तुळजापूर च्या भवानी मातेच्या पलंग विशेषांक
श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा थक्क करणारा प्रवास
मोगल बादशहा अहमदशाह यांचे नगरला बादशाही होती तेव्हाची गोष्ट नगरचे तेली कुटुंब हे बादशाही यांना घाण्याचे तेल पुरवठा करत असत एक वेळेस नगरचे तेली यांचे आडनाव पंलगे हे किल्ल्या मध्ये तेल पुरवठा करुन परत त्यांच्या कुटीराकडे निघाले असताना रस्त्याच्या कडेला एक मुलगी रडताना पंलगे यांना दिसली पंलगे यांनी त्या मुलीला का रडण्याचे कारण विचारले परंतु मुलीने कुठलीच प्रतिक्रीया व्यक्त केले नाही तेव्हा पंलगे यांनी आसपास कोणी आहे का तेही पाहिले परंतु आसपास कोठेही कोणीच दिसले नाही म्हणून त्यांनी त्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेले घरी त्यांच्या पत्नी ला सांगितले की आसपास कोठेही कोणीच नव्हते तेव्हा मी या मुलीला आपल्या घरी घेऊन आलो आहे तेव्हा त्यांना मुलबाळ नव्हते पत्नीने त्या मुलीचे संगोपन करण्याचे ठरविले मग दोघेही पती पत्नी ने पोटच्या मुली सारखी सांभाळत होते मुलीचे वय दिवसेंदिवस वाढत होते तसेच मुलगी खूप सौंदर्य रुपवान दिसु लागली एके दिवशी बादशहाच्या सैनिकाच्या नजरेस ही मुलगी पडली तेव्हा त्या सैनिकाने बादशहाच्या कानी सांगितले की पंलगे यांना एक मुलगी आहे ती खूप रुपवान आहे तेव्हा बादशहाने फर्मान सोडले मुलीला माझ्या समोर हजर करा बादशाही फर्मान सुटल्यावर सैनिक बृहान नगर मध्ये शोधु लागली परंतु पंलगे यांना बादशहाच्या फर्मान ची खबर लागल्याने त्यांनी मुलीला गवताच्या गंजी मध्ये लपवून ठेवले सैनिक जो पर्यंत जात नाही तोपर्यंत गंजी च्या बाहेर निघू नको पुर्वी मोघल बाया तरुण मुली यांना पळवीत असत सैनिक संध्याकाळ पर्यंत मुलीचा शोध घेत होते संध्याकाळी किल्ल्याचे दरवाजे बंद होत असत सैनिक कंटाळून निघून गेले आता पंलगे यांना मुलीचे जीवाचे बरेवाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी मूलीला घेऊन लांब कोठे तरी सुरक्षित ठिकाणी जायचे ठरविले सायंकाळी मुलीला घेऊन निघाले परंतु आपले घराकडे त्याचा ओड लागले मुलीने पंलगे यांना सांगितले की आपली झोपडी पेटवून द्या पंलगे यांनी झोपडी पेटवली मूलीने सांगितले तुम्ही माझ्या मागे चला तसे पंलगे चालत राहिले चालत चालत थेट तुळजापूर ला पोहचले तुळजापूर मध्ये दर्शन घेतल्यानंतर मुलगी गायब झाली पंलगे यांनी हाबरंडा फोडला माझी मुलगी हरवली आहे कोणी तरी शोधुन द्या हि मुलगी म्हणजे आई तुळजाभवानी हिने मुलीच्या रुपात पंलगे यांच्या कडे राहिली तुळजापूर मध्ये परत देवीने पंलगे यांना दर्शन दिले व सांगितले की नवरात्रात माझ्या साठी पालखी तयार करुन त्या वर गादी ठेवून ते बृहान नगर वरुन तुळजापूर पर्यंत घेऊन यायचे असे वचन घेतले. पंलगे आई तुळजाभवानी मातेने सांगितले की तुम्ही फक्त पालखी चे साहित्य घेऊन पुणे येथे घेऊन जायचे.
श्री तुळजाभवानी देवीचा नविन पलंग बनविण्याकरिता पुर्वी *नगरचे तेली पलंगे* कुटुंबीय श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाच्या दिवशी नगर येथुन जुन्नर कडे *चार घोडयावर* सामान घेऊन मजल दरमजल तीन मुक्कामा नंतर पोहचत असतं तेथील कार्य संपन्न करून ते सामान घेऊन घोडेगांव ला जावुन श्रावणी अमावास्या पोळा सणाच्या दिवशी पलंग बनुन पुर्ण होत असत आणि ऋषीपंचमीच्या दिवशी प्रस्थान होवुन षष्ठी ला जुन्नर ला पोहचत होते.
चला तर आपण पाहूया, श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा, *बनविण्यापासून* ते तुळजापुरात *पोहोचण्या पर्यंत* चा सर्व प्रवास…!!
श्री तुळजाभवानी मातेचा हा *पलंग बनविण्याचा मान* मूळचे घोडेगाव (पुणे) (भिमाशंकर जवळ),
पण सध्या पुण्यात स्थायिक असणारे *ठाकूर* (कातारी) कुटुंबियांना आहे.
त्यांना हा मान *राजमाता जिजाऊंच्या* नवसपूर्तीमुळे *राजे शहाजी* यांनी त्यांना दिला व घोडेगाव (पुणे) येथे बक्षीस म्हणून जागा सुद्धा दिलेली आहे.
पलंगाचे कातीव कामासाठी आंब्याचे आणि सागवान लाकुड, रंगकाम कामाकरिता लाखाचे रंग, लोखंडी साहीत्य खिळे पट्टी, सुती नवार पट्टी, दोरखंड, गादीसाठी कापुस, वरील छताकरिता कापड तसेच इतर लागणारे सर्व काही साहित्य-सामान हे
जबाबदारीने *अहमदनगर* येथील *पलंगे* (तेली) घराण्याकडुन घोडेगावच्या *ठाकूर* कुटुंबियांना *पुरवले* जातात.
मग हे ठाकूर कुटुंबिय *रविवार पेठ पुणे* येथे स्वत:चे दुकानात, श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे मुख्य पुजारी मानकरी श्री पलंगे कुटुंबिय आणि ठाकूर कुटुंबिय यांचे हस्ते लाकडाचे पूजन होऊन,
आषाढ महिना ते नागपंचमी असे सुमारे ३० ते ३५ दिवस, ठाकूर परिवार पलंगाचे विविध भाग बनवत असतात.
सर्व भाग बनवून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पूर्ण भागांची पूजा होऊन पलंगाचे सर्व भाग घोडेगाव (पुणे) येथे आणले जातात.
श्रावण शुद्ध षष्टी ते श्रावण सप्तमी पर्यंत घोडेगाव (पुणे) येथील *भागवत* कुटुंबिय हे पलंगाचे भाग जोडत असतात. भाग जोडणी च्या आधी, भागवत कुटुंबिय आणि पलंगे कुटुंबिय यांचेकडून पलंग भाग जोडणीची पूजा संपन्न होऊन, पलंग जोडणीला सुरवात होते.
एकदा का पूजन संपन्न झाले की पलंग बनवायला घेतल्यावर संपुर्ण जोडणी होईपर्यंत *भागवत* कुटुंबिय कुठलीही विश्रांती न घेता, ही सेवा मनोभावे करत असतात. *कृष्णाष्टमीला* सकाळी *पलंग संपूर्ण बनवून* होतो.
पलंग *घोडेगाव (पुणे)* मध्ये बनवून पूर्ण झाल्यावर, त्याच्यावर दोरखंडाची बांधणी पलंगे कुटुंबियांकडून केली जाते आणि मग तो पलंग संपूर्ण घोडेगाव (पुणे) मध्ये फिरवतात दवंडी पिटवतात की, श्री तुळजाभवानी मातेचा श्रमनिद्रेसाठी असणारा पलंग बनवून पूर्ण झाला.
मिरवणूकीत पलंग हा, ठाकूर कुटुंबियांच्या घोडेगाव (पुणे) येथील घरासमोर ठेवतात आणि मग पलंग बांधणीची *पहिली मानाची आरती ठाकूर कुटुंबिय* यांच्याकडून होते.
मिरवणूक संपन्न झाल्यावर, पलंग घोडेगाव (पुणे) येथील तिळवण तेली समाज ट्रस्ट चे
*श्री शनैश्वर मंदिरात* ठेवतात.
मग पलंगाचे मध्ये सुती नवार पट्टीची बांधणी श्री. पलंगे कुटुंबिय आणि घोडेगाव येथील सेवेकरी यांच्या हस्ते होते.
सुती कापड छतावर टाकले जाते आणि सुती नवार पट्टीवर एक नवीन सुती कापड टाकले जाते.
मग श्री तुळजाभवानी मातेचा पलंग *ऋषीपंचमी* ला *जुन्नर* येथील *शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी* असणारे, बुधवार पेठ येथील तिळवण तेली समाज धर्मशाळेत आणला जातो.
इथे पलंग आल्यानंतर पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी *पलंगावर विधिवत श्री तुळजाभवानी मातेची स्थापना होते*. त्यात *पलंगे* कुटुंबिय यांच्याकडून देवीच्या निद्रेसाठी *मानाची गादी, तक्या* स्थापन होते.
श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे *जुन्नर मध्ये १० दिवस* वास्तव्य असते, कारण जिजाऊंच्या नवसपूर्तीमुळे जिजाऊंनी जुन्नर मधून पलंगाच्या प्रवासाला सुरवात केली. इतिहासात उल्लेख आढळतो की, राजमाता जिजाऊ श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे दर्शनासाठी यायच्या.
जुन्नर मधील वास्तव्यनंतर, पलंगाचे श्री क्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान होते.
श्री तुळजाभवानी मातेचा पलंग खांद्यावर डोक्यावर वाहून, पायी तुळजापूरला नेण्याची परंपरा आहे.
*आता आपण पाहूया थक्क करणारा प्रवास* ..!!
श्री तुळजाभवानी मातेचा पलंग, ५ जिल्हे (पुणे, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद) फिरून तुळजापूर मध्ये पोहोचतो…!!
*पुणे जिल्हा प्रवास*
१) घोडेगाव (पुणे) ( १२ दिवस मुक्काम – १३ व्या दिवशी प्रस्थान)
२) घोडेगाव (पुणे) ते निमदरी ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १७ किमी.)
३) निमदरी ते जुन्नर ( १० दिवस मुक्काम ११ व्या दिवशी प्रस्थान, प्रवास ९ किमी.)
४) जुन्नर ते कुमशेत ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ५ किमी.)
५) कुमशेत ते हापुसबाग ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ६ किमी.)
६) हापुसबाग ते नारायणगाव ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १५ किमी.)
७) नारायणगाव ते आळे ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास २५ किमी.)
८) आळे ते राजुरी ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ४ किमी.)
*अहमदनगर जिल्हा प्रवास*
९) राजुरी (पुणे) ते अळकुटी ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १६ किमी.)
१०) अळकुटी ते वडझिरे ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १३ किमी.)
११) वडझिरे ते पारनेर ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास २५ किमी.)
१२) पारनेर ते कान्हूरपठार ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १३ किमी.)
१३) कान्हूरपठार ते किन्ही ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ७ किमी.)
१४) किन्ही ते गोरेगाव ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ६ किमी.)
१५) गोरेगाव ते टाकळीखातगाव ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास २० किमी.)
१६) टाकळी खातगाव ते भूतकरवाडी ताठेमळा (नगर शहर) ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १९ किमी.)
१७) ताठेमळा ते नालेगाव (नगर शहर) ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ५ किमी.)
१८) नालेगाव ते सबजेल चौक (नगर शहर) ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १० किमी.)
१९) सबजेल चौक ते कलेक्टर ऑफिस चौक (नगर शहर) ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ५ किमी.)
पुणे जिल्हा ते अहमदनगर जिल्हा, या मधले मुक्कामाचे आणि मधले सर्व विसाव्याचे गाव धरून, श्री तुळजाभवानी मातेचा पलंग, ३९ दिवसात, २२० किलोमीटर प्रवास करून,
नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला *भिंगार* (नगर) ला पोहोचतो.
भिंगार ला रात्री ११ ते १२ च्या दरम्यान
श्री तुळजाभवानी मातेच्या *सीमोल्लंघन पालखीची* (राहुरी , हिंगणगाव, बुऱ्हाणनगर मार्गे येणारी) आणि
या वरील उल्लेख केलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या *श्रमनिद्रा पलंगा* ची ऐतिहासिक भेट *मारुती मंदिर, भिंगार (नगर)* येथे पार पडते.
नंतर श्री तुळजाभवानी मातेचा हा पलंग, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा असा नवरात्रीची तिसरी माळ ते नवरात्राची नववी माळ अशी ७ दिवस २४ तासात म्हणजे दिवस रात्र प्रवास करत असतो.
नगर लगत असणारी लोणी सय्यदमीर, कुंटेफळ, चिंचोडी पाटील,कुंडी या चार मानाच्या गावचे मातेचे भक्त पलंगासोबत सेवा करण्याचे काम करत असतात.
*बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा प्रवास*
पुढे ७ दिवसांमध्ये पलंगाचा प्रवास मार्ग हा निमोडी, सारोळा, लोणी सय्यदमीर, कुंटेफळ, चिंचोडी पाटील, कुंडी, धानोरा, कडा, आष्टी, पांढरी, जामखेड, खर्डा, भूम, ओरसाली, आगळगाव, बाभळगाव (ता. बार्शी), दगडधानोरा, घारीपुरी, कारिनारी, झरेगाव, बोरगावहून चिलवडी (ता. उस्मानाबाद), आपसिंगा आणि
*दसऱ्याच्या* आधल्या दिवशी *तुळजापुरातील मोतीझरा* येथे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोहोचतो.
पहा ना, असा २२० किलोमीटरचा प्रवास फक्त ७ दिवसात, हा तुळजाभवानी मातेचा श्रमनिद्रा पलंग प्रवास करून श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये पोहोचतो…!!
*घोडेगावपासून श्री क्षेत्र तुळजापुरात हा पलंग पोहोचायला तब्बल ४६ दिवस लागतात.*
म्हणजे पहा ना घोडेगाव (पुणे) ते अहमदनगर असा प्रवास करायला ३९ दिवस लागून सर्व प्रवास हा २२० किलोमीटर असतो. तर नवरात्र तिसरी माळ ते नवरात्र नववी माळ, असे ७ दिवस लागून पुढील २२० किलोमीटर प्रवास हा दिवस रात्र करत असतो. हे खूप विचार करायला आणि थक्क करणार आहे.
ज्या प्रमाणे नवरात्रात ९ दिवस देवी महिषासुराशी युद्ध करते आणि जिकल्यानंतर श्रम जाण्यासाठी देवी श्रमनिद्रा घेते, तसाच हा *श्रमनिद्रा पलंग*, शेवटचे ७ दिवस मातेचे भक्त खांद्यावर घेवून रात्र-दिवस पायी चालत असतात आणि शेवटी पलंग देवीच्या श्रमनिद्रा साठी तुळजापुरात पोहोचतो.
तुळजापुरातील शुक्रवार पेठेतील आडेकर कुटूंबियांच्या घरासमोरील पारावरून या *पलंगाची मिरवणूक* निघते व तुळजाभवानी मंदिरात पोहचते.
*दसऱ्याला पहाटे* तुळजाभवानी देवी पलंगावर निद्रा घेते.
कोजागिरी पौर्णिमेला *जुना पलंग* मंदिरातील होमाच्या अग्नीमध्ये सन्मान पूर्वक तोडून जाळून विसर्जन करतात आणि *नवा पलंग* तुळजाभवानी देवीच्या मंदिरात, भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातो.
व ही होमातील *राख* देवीच्या मूर्तीला दररोज लावल्या खेरीज, नित्य पूजा संपन्न होत नाही, हे वैशिष्ट्य आहे.
*शेकडो वर्षांपासूनची ही धार्मिक परंपरा,* आजही तशीच सुरू आहे.
प्रपंचाची पर्वा न करता, धर्मासाठी राबणारे हात अजूनही शिल्लक आहेत,
हेच घोडेगावचे ठाकूर (कातारी) कुटुंबिय, भागवत (सुतार) कुटुंबिय आणि नगरचे पलंगे (तेली) कुटुंबिय या घराण्याने दाखवुन दिले आहे.