जामखेड न्युज——
साकतमध्ये दिराने केला भावजईचा खुन, दोन आरोपी ताब्यात
घरात किराणामाल आणण्यासाठी पैसे नाहीत म्हणून मुलीला सोबत घेत मयत सीमा ही पती बसलेल्या ठिकाणी जाऊन पतीच्या खिशातून चारशे रुपये काढून घेतले. यावेळी पती बरोबर झटापट झाली पतीने शिवीगाळ व मारहाण केली तेव्हा मयत सीमानेही पतीच्या तोंडात चापट मारली याचा राग मनात धरून दिराने घरी येत भावजईला शिवीगाळ करत ढपलीने डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. शेजाऱ्यांनी सीमाला जामखेड येथे दवाखान्यात नेले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवरा व दिर दोघांवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपी पती बाळू अरूण घोडेस्वार व दिर अतुल अरूण घोडेस्वार या दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र आश्रुबा सरोदे वय ५९ रा. पारगाव घुमरा ता. पाटोदा जि. बीड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे की, माझी मुलगी सीमा वय ३५ वर्षे हिचे पंधरा वर्षांपूर्वी जामखेड तालुक्यातील साकत येथील बाळू अरूण घोडेस्वार याच्याशी लग्न झाले होते. जावाई बाळू यास दारूचे व्यसन आहे. गेल्या सात आठ वर्षापासून पती बाळू घोडेस्वार व दिर अतुल घोडेस्वार हे दोघे सीमास माहेरून पैसे आण म्हणून मानसिक व शारीरिक छळ करत होते. मारहाण करत होते. तसेच अनेक वेळा उपासपोटी ठेवत होते. असे ती माहेरी आल्यावर सांगत होती.
काल दि. ८ रोजी रात्री माझी नात दिक्षा हिचा फोन आला व रडायला सुरूवात केली आणि सांगितले की, अंकलने मम्मीला खुप मारले आहे. ती बेशुद्ध पडली आहे. मी व माझा मुलगा ताबडतोब साकतला येण्यासाठी निघालो साकतला आल्यावर आम्हाला समजले की, सीमाला अंकुश घोडेस्वार व इतर नातेवाईकांनी जामखेडला दवाखान्यात नेले आहे. आम्ही ताबडतोब जामखेड येथील सहारा हाँस्पिटलला आलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की डोक्याला खुप मार लागला आहे. रक्तस्राव होत आहे पेशन्टला नगरला हलवावे लागेल. आमच्या कडे पैसे नसल्याने आम्ही सरकारी दवाखान्यात आणले तर तेथील डॉक्टरांनी सीमाला मृत घोषित केले. सीमावर साकत येथे सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेची माहिती समजताच जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पो. ना. कोपनर, पो. काँ. प्रवीण इंगळे, पो. कॉ. प्रकाश मांडगे, पो. कॉ. कुलदीप घोळवे, पो. कॉ. पळसे, पो. कॉ. देशमाने, पो. कॉ. नवनाथ शेकडे, पो. ना. जितेंद्र सरोदे या पथकाने काही तासातच तातडीने कारवाई करत आरोपी अतुल अरूण घोडेस्वार व बाळू अरूण घोडेस्वार यांना ताब्यात घेतले आहे. दुपारी न्यायालयात हजर करणार होते.