जामखेड न्युज – – – –
कोरोनापासून प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क वापरणे सक्तीचे असले, तरी ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या महानिदेशकांनी (डीजीएचएस) केली आहे. डीजीएचएसने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार फक्त ६ ते ११ वयोगटातील मुलांना पालक व डॉक्टरांच्या देखरेखीखाली मास्क लावावा, असे म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून सविस्तरपणे देण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये १८ वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी रेमडेसिविर वापरू नये, तसेच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कारण ३ ते १८ वयोगटापर्यंत रेमडेसिविर वापरण्याबाबत कोणत्याही अभ्यासाचे अहवाल उपलब्ध नाहीत. हाय रिझोल्यूशन सीटी स्कॅनचा पर्यायही निवडक रुग्णांसाठीच वापरावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.
कोरोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जाणे आवश्यक आहे, द्रव आणि इलेक्ट्रोलाईट संतुलन राखले जाणे आवश्यक आहे आणि कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असेही सांगण्यात आले आहे.
लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य कोरोना रुग्णांमध्ये उत्तेजक (स्टिरॉईड) धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या कोरोना रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्टिरॉईड देण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. स्टिरॉईड योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांत सांगण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते स्टिरॉईड सर्रासपणे होणारा वापर देशात काळ्या बुरशीचा संसर्ग निर्माण होण्याचे कारण आहे.