जामखेड न्युज——
रस्त्याचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा अन्यथा व्यापाऱ्यांसह नागरिक तीव्र आंदोलन करणार – महेंद्र बोरा
दोन आमदार असतानाही जामखेडच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था
जामखेड साठी दोन आमदार असतानाही शहरात सह नगर रोड व बीड रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे. यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. सध्या रिमझिम पाऊस असल्याने रस्ता खूपच निसरडा झाला आहे. चिंचपूर ते जामखेड व जामखेड ते सौताडा रस्त्याची खुपच दुर्दशा झाली आहे. यामुळे अनेक लोक जामखेड सोडून नगर पुण्याला स्थलांतरित होऊ लागले आहेत. ठेकेदाराने ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा व्यापाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जामखेड न्युजशी बोलताना व्यापारी महेंद्र बोरा यांनी दिला आहे.
चिंचपूर ते जामखेड व जामखेड ते सौताडा या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. ठेकेदाराने अत्यंत संथगतीने काम सुरू केले आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. लोकांचे खुपच हाल होत आहेत. अनेक गाड्या घसरत आहेत. अनेक अपघात होत आहेत. लोक जामखेड वगळून दुसऱ्या मार्गाची निवड करत आहेत तर अनेक प्रतिष्ठित नागरीक जामखेड शहर सोडून नगर पुण्याला स्थायीक होऊ लागले आहेत. त्यामुळे ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा व नागरिकांचे स्थलांतर थांबवावे अशी मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी. रस्ता १५७.६२ कोटी रुपयांचा रस्ता ठेकेदार ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी ८६.०९ कोटी रुपयांना काम घेतले आहे. या कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांनी दि. २४ फेब्रुवारी २४ रोजी केले आहे. अठरा महिन्यात काम करण्याचा कालावधी आहे सहा महिने झाले तरी फक्त रस्ता खोदून माती मिश्रीत मुरूम टाकल्याने सध्या अनेक गाड्या घसरत आहेत. मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
रस्ता सुरू झाल्यावर गोरगरीब लोकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतले मोठ मोठ्या लोकांचे अतिक्रमणे तसेच आहेत काढून घेतलेल्या अनेक लोकांनी परत गाडे लावले आहेत. यातच हे प्रकरण कोर्टात गेले आहे. कोर्टाने संयुक्त मोजणी करण्याचे आदेश दिले जे कोर्टात गेले होते त्यांचीच मोजणी केली आहे. यामुळे शहरातील काम तसेच आहे शहराच्या बाहेर रस्ता खोदून मुरूम टाकल्याने पावसामुळे अनेक वाहने घसरून पडत आहेत.
रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे लोक जामखेडला राहणे नको म्हणतात नगर पुण्याला लोक जाऊ लागले आहेत. तसेच जामखेडची वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा कमीत कमी खड्डे तरी बुजवावेत अन्यथा व्यापारी व नागरिकांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी महेंद्र बोरा यांनी दिला आहे.