जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आखिल भारतीय प्रजापती कुंभार समाज महासंघ दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आण्णा राऊत (वय६२) यांचे दि १ मे रोजी दुखद निधन झाले आहे. या दुख:द बातमीवर कोणाचा विश्वास बसत नव्हता. सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा येत होत्या व दुपारी श्रध्दांजली वाहण्याचा वाईट प्रसंग आला
विठ्ठल राऊत यांच्या अकाली निधनामुळं जामखेड तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जामखेड ग्रामपंचायतचे उपसरपंच झाल्यावर आजपर्यंत ‘डेप्युटी आण्णा’ नावानं लोक संबोधत होते. आण्णा म्हणजे जामखेडच्या सार्वजनिक जीवनातील एक सकारात्मक कणखर नेतृत्व होते. समाजकार्यात नेहमी आघाडीवर असायचे. मागील महिन्यात आरोळे कोविड सेंटरला शौचालय बांधकामासाठी विटांची गरज होती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आण्णाला विनंती केली. आण्णांनी या कामी पुढाकार घेतला व समाजबांधवांना एकत्र करून आरोळे कोविड सेंटरला पंधरा हजार वीट (पंच्याहत्तर हजार रुपयांची) दिली. यामुळे सुमारे शंभर कोरोना रुग्णांची सोय झाली होती.
१ मे आण्णांचा जन्मदिवस या दिवशी या दिवशी ते जामखेड ते श्री क्षेत्र तेर – ढोकी पायी दिंडी काढत असत अनेक ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला सौताडा घाटात देवीचे मंदिर बांधले तीन दिवस यज्ञ केला नवरात्र उत्साहात ते जामखेड वरून दररोज सकाळी पायी जात होते मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहही करत होते. १ मे हा जन्मदिन तोच त्याचा मृत्यूदिन ठरला.
सतत सामाजिक कार्यात ते हिरिरीने सहभागी होत. शांतता कमिटीच्या बैठकीत न चुकता हजर राहत व जनता, व्यापारी व प्रशासन यामधे समन्वयाची भूमिका बजावत होते.
सामान्य परिस्थितीतून जामखेड शहरात पहिले सिनेमा थिएटर, विटभट्ट्या, किराणा दुकान, पतसंस्था एवढा डोलारा अगदी शून्यातून निर्माण केला. पण कधी गर्व केला नाही. कोरोना काळात अनेकांना मदत केली पण प्रसिद्धी कधी केली नाही. आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही.
कोरोना संसर्गापासुन लोकांचा बचाव व्हावा यासाठी प्रशासनाशी प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत नेहमी सल्लामसलत करणारे आण्णा यांना कसलाही आजार नव्हता कि, कसलेही व्यसन नव्हते सकाळी दररोज न चुकता फिरायला येत होते. व लोकांनी दररोज सकाळी फिरावे आपले आरोग्य चांगले राखावे म्हणून आग्रही आसायचे,
आण्णांच कोरोना पॉझिटिव्ह झाले होते पंधरा दिवस उपचार सुरु होते. नियतीने घाला केला अनेकांचा आधारवड हरवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, पुतने, सूना नातवंडे असा परिवार मोठा परिवार आहे. शिक्षक नेते नारायण राऊत यांचे ते चुलते होते.