जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून ‘फेडरल बँक हॉर्मीस मेमोरियल फाऊंडेशन’ व ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमधील ३ तर जामखेडमधील २ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी लस व औषधसाठा करण्याकरिता रेफ्रिजरेटर (शितयंत्रे) प्रदान करण्यात आली. बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते या शितगृहांचे लोकार्पण करण्यात आले. कर्जतमधील राशीन, कुळधरण, मिरजगाव तर जामखेडमधील आरणगाव, नान्नज या आरोग्य केंद्रांचा त्यामध्ये सामावेश आहे. याचवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने राशीन, कर्जत, मिरजगाव येथे घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराचेही उद्घाटन सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले.
कोरोना महामारीच्या कठीण काळात आ.रोहित पवार हे कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. नागरिकांच्या लसीकरण मोहीमेला गती मिळावी यासाठीही प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आरोग्य केंद्रांना ही शितयंत्रे प्रदान करण्यात आली आहेत. फेडरल बँकेच्या सी.एस.आर.फंडातून कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी ही शितयंत्रे देण्यात आलेली आहेत. नागरिकांना देण्यात येत असलेली कोव्हीड लस एका विशिष्ट तापमानात ठेवणे गरजेचे असते आणि ते तापमान कायम राखण्यासाठी रेफ्रिजरेटर (शीतयंत्राची) गरज भासत असते. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार ही प्रक्रिया काही काळ सुरू राहणार आहे त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लस सुरक्षित ठेवण्यासाठी या शितयंत्रांचा वापर होणार आहे. या शितयंत्रांमुळे कर्जत व जामखेडमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या लसीकरण मोहीमेला आणखी गती मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. आ. रोहित पवार यांच्या आवाहनातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे सुनंदा पवार यांनी कौतुक केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, जि.प.सदस्य गुलाब तनपुरे,कानगुडवाडीचे सरपंच शाम कानगुडे, विशाल शेटे,अतुल राजेजाधव, गणेश नलावडे, दादासाहेब तनपुरे,प्रकाश क्षिरसागर,तानाजी पिसे,राम रणदिवे,महेश म्हस्के,वैभव पवार,संकेत चेडे,शुभे दादा पठाण,राजश्री चव्हाण,सुधीर जगताप, सनी सुपेकर, सोमनाथ गजरमल,संदीप जगताप,सोनु बागवान आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

___________
लसीकरणासाठी शितयंत्रांचा चांगला फायदा!
‘लसी व औषधांचा साठा ठेवण्यासाठी या शितयंत्रांची खूपच गरज होती. ‘फेडरल बँक हॉर्मीस मेमोरियल फाऊंडेशन’च्या मदतीमुळे लसीकरणाच्या वेळी या शितयंत्रांचा उत्तम फायदा होणार आहे. यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळून लसीकरणही वेगाने करता येईल. याबद्दल फेडरेल बँक व्यवस्थापनाचे आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केलेल्या सर्व टिमचे आ.रोहित पवार यांच्या वतीने आभार मानते.’
– सुनंदाताई पवार
