जामखेड न्युज——
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते आपले केले – प्रा. राम शिंदे
आमदार शिंदे लोकसभेसाठी इच्छुक

देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत भाजपाचा झंझावात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खुपच व्यापक आहे. त्यामुळे जे जे विरोधी पक्षनेते झाले ते फडणवीस यांनी आपलेसे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता अजित पवार यांचा नंबर आहे असे मत आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

भाजपचे आमदार प्रा.राम शिंदे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे आज त्यांनी अहमदनगर येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यामुळे आता राजकीय समीकरणे बदलनार आहेत.

प्रा. राम शिंदे हे दोन वेळा कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्याचबरोबर मागील पंचवार्षिक मध्ये त्यांना मंत्रीपद व पालकमंत्री पद मिळाले होते. त्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात त्यांचा संपर्क वाढलेला आहे. त्याचबरोबर भाजप पक्षामध्ये देखील त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाते. मागील दोन निवडणुकीत निवडणुकीच्या वेळी त्यांची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी बाबत चर्चा रंगली होती. सध्या मात्र त्यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये आ. राम शिंदे यांनी सांगितले की 2014 च्या निवडणुकीच्या वेळी पक्षाने मला उमेदवारीसाठी विचारले होते. परंतु त्यावेळी प्रताप ढाकणे इच्छुक होते. पक्षाने त्यावेळी स्व. दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा पक्षाने मला उमेदवारी बाबत विचारणा केली. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांनी पक्षात प्रवेश केला व त्यांना उमेदवारी देण्यात आली.
आ. प्रा.राम शिंदे यांना जर लोकसभेची उमेदवारी भाजप पक्षाने दिली तर अहमदनगर दक्षिणचे सध्याचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होईल अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.






