“माझे सगळे ऐकतात, मग जामखेडला पाणी का नाही?” राम शिंदेंना राष्ट्रवादीचा थेट सवाल! सात वर्षांपासून पाणी योजना रखडल्याने जामखेडकरांचा संताप, हक्काच्या पाण्यासाठी उद्या शहर बंदची हाक, व्यापारी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
“माझे सगळे ऐकतात, मग जामखेडला पाणी का नाही?” राम शिंदेंना राष्ट्रवादीचा थेट सवाल!
सात वर्षांपासून पाणी योजना रखडल्याने जामखेडकरांचा संताप, हक्काच्या पाण्यासाठी उद्या शहर बंदची हाक, व्यापारी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
“माझ्या मतदारसंघात माझं लक्ष आहे, माझं सगळे ऐकतात,” असे सांगणारे सभापती प्रा. राम शिंदे यांना आता जामखेडच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्र पक्षांनी थेट सवाल केला आहे. सगळे तुमचे ऐकतात, तर मग जामखेडकरांना पाणी का मिळत नाही? सात वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलीच कशी? असा सवाल उपस्थित करत हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) जामखेड शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
जामखेड शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संताप वाढत आहे. कधी १५ दिवस, तर कधी महिनाभर नळाला पाणी येत नसल्याची परिस्थिती आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून शहरातील ३० वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तब्बल ५० किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याने जामखेडच्या पाणीप्रश्नाची तीव्रता स्पष्ट होत आहे.
सात वर्षांपासून योजना रखडलीच कशी? जामखेड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दहिगाव-जामखेड आणि उजनी-जामखेड पाणीपुरवठा योजनांची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, सात वर्षांचा कालावधी उलटूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने या योजनांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अतिक्रमण, रस्ता मोजणी, जलवाहिनीचे काम आणि विविध प्रशासकीय अडथळ्यांमुळे पाणी योजनेचे काम रखडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नागरिकांना मात्र दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मतदारसंघातील प्रत्येक कामावर लक्ष असल्याचा दावा केला जात असताना जामखेडच्या मूलभूत पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
बंदमधून तीन प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जामखेड शहराला दर सहा दिवसांनी स्वच्छ व नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा.आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली उजनी-जामखेड पाईपलाईन योजना तातडीने पूर्ण करावी. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शहर व वाड्या-वस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे.
हा पक्षाचा नव्हे, जामखेडकरांच्या हक्काच्या पाण्याचा लढा! “पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे हा बंद कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून जामखेडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठीचा लढा आहे,” अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे. या बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, महिला, तरुण, शेतकरी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“पाणी नाही तर काहीच नाही. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एक दिवस दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्या. पुढील पिढीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आता एकजुटीने आवाज उठविण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्र पक्ष जामखेडकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर उद्याच्या बंदला किती प्रतिसाद मिळतो आणि प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.