जामखेडच्या वैद्यकीय क्षेत्राचा मान उंचावला! डॉ. ओम कोल्हे यांची INI-CET परीक्षेत देशात ५४३ वी रँक!
६१ हजार विद्यार्थ्यांमधून मिळवले घवघवीत यश, जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे भव्य सत्कार
देशपातळीवरील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेच्या AIIMS PG / INI-CET परीक्षेत जामखेडचे सुपुत्र डॉ. ओम उमा संजय कोल्हे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत ऑल इंडिया रँक ५४३ मिळवली आहे. देशभरातून ६१ हजार ८१२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३४ हजार २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या स्पर्धेत डॉ. ओम यांनी मिळवलेले यश जामखेडच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत यश मिळवणारे ते जामखेडमधील पहिले विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने डॉ. ओम कोल्हे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. महादेव पवार, डॉ. सुहास सूर्यवंशी आणि डॉ. रोहन टोमके यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुहास सूर्यवंशी होते.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, AIIMS PG / INI-CET सारख्या अत्यंत कठीण स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द, सातत्य आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे असते. डॉ. ओम कोल्हे यांनी मिळवलेले यश जामखेडच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी गौरवास्पद असून त्यांच्या यशातून परिसरातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
डॉक्टर होणे म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर समाजाप्रती मोठी जबाबदारी स्वीकारणे होय. आपल्या ज्ञानाचा उपयोग रुग्णसेवेसाठी करून समाजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमात डॉ. ओम यांची छोटी बहीण सिद्धी संजय कोल्हे हिचेही विशेष कौतुक करण्यात आले. तिचे बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांनी वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे उपस्थितांनी विशेष अभिनंदन केले.
याप्रसंगी डॉ. सुरेश काशीद, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. बाबासाहेब कुमटकर आणि डॉ. रोहन टोमके यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. ओम यांच्या यशाचे कौतुक केले. जामखेडमधील गुणवंतांचा सत्कार करणे हा असोसिएशनचा सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम असून गुणवंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संघटना हे कार्य करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी डॉ. पांडुरंग सानप, डॉ. विद्या काशीद, डॉ. अशोक बांगर यांच्यासह असोसिएशनचे सर्व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुनील गंडाळ यांनी केले.डॉ. ओम कोल्हे यांच्या या यशामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.