जामखेडची ज्वारी लईच भारी!!! तिची चवही आहे न्यारी!!! जामखेडच्या ज्वारीला राज्यभरातून मागणी

0
252

जामखेड न्युज——

जामखेडची ज्वारी लईच भारी!!!
तिची चवही आहे न्यारी!!!

जामखेडच्या ज्वारीला राज्यभरातून मागणी

जामखेड तालुका हा तसा अवर्षणप्रणव क्षेत्रामध्ये मोडणारा भाग म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामाचा तालुका म्हणून जामखेडची ओळख आहे. रब्बी हंगामात ज्वारी गहू, हरभरा ही प्रमुख पिके या तालुक्यात घेतली जातात. मात्र येथील ज्वारीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. खाण्यासाठी चवदार, पांढरी शुभ्र ज्वारी असल्याने येथील ज्वारी मुंबई-पुणे सारख्या शहरातूनही प्रचंड मागणी असते. म्हणून जामखेडची ज्वारी लई भारी तिची चवही आहे न्यारी असे म्हणतात.

जामखेड तालुक्यात विशेषतः घाटमाथ्यावर खरीप हंगामातील सोयाबीन पिकानंतर रब्बी हंगामात ज्वारीचे घेतात सध्या ज्वारी कापणीची लगबग सुरू आहे. भलरीचा आवाज ऐकायला मिळतोय.

“भलगडी दादा भलरी, व्हय गड्या, दादा भलरी..’

अशा गीतांच्या तालावर सध्या जामखेड तालुक्‍यात ज्वारीच्या काढणीला वेग आला आहे. घाटमाथ्यावर
एकाच वेळी ज्वारी काढायला आल्याने मजुरांची टंचाई जाणवत आहे. मजूर कमी व ज्वारीचे क्षेत्र जास्त झाल्याने रोजंदारीचीही चढाओढ सुरू झाली आहे. ज्वारीच्या काढणीस उशीर झाला तर पानगळ होऊन ज्वारी काढता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ज्वारी काढण्यासाठी चढाओढ लागली आहे. पुन्हा “इर्जिक’ जोरात… हलगी, डफडे, पिपाणीच्या तालावर ज्वारीची काढणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मांसाहारी व शाकाहारी जेवणाच्या पंगतींसह “इर्जिक’ (सामूहिक शेती) जोरात सुरू आहे.

जामखेड तालुक्यात ज्वारी काढणीला वेग आलाय.
सध्या मात्र दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे व काही भागात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्वारी काढून ठरवल्यावर जर भिजली तर ती काळी पडते काही काळा पडतो यामुळे बाजारात एकदम कमी किंमत मिळते. काही दिवस तरी पावसाने उघड द्यावी असे शेतकरी वर्गाचे मत आहे.

जामखेड तालुक्यातील जूट, बेद्री, दगडी या स्थानिक वाणाबरोबरच मालदांडी, रेवती, वसुधा या सुधारित वाहनांनाही शेतकरी पेरणीसाठी पसंती दर्शवतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पन्न घेऊन शहरी बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न इथला शेतकरी वर्ग करताना दिसतो.. याही वर्षी तालुक्यात 32 हजार 298 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालेली असून हा जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीचा पेरा ठरलेला आहे.

 

अहमदनगर जिल्ह्यात ज्वारीची पेरणी रब्बी हंगामामध्ये सर्वसाधारणपणे गोकुळाष्टमीच्या नंतर सर्वत्र केली जाते. जामखेडला मात्र थोडीशी उशिरा म्हणजेच ऑक्टोबरमध्ये हस्त नक्षत्रात ज्वारीची पेरणी केली जाते. ज्वारी हे पीक सर्वसाधारणपणे 110  ते  120 दिवसांमध्ये तयार होते. पेरणीसाठी हेक्‍टरी 10 किलो बियाणे पुरेसे होते. बहुतांश शेतकरी 45 बाय 15 सेंटीमीटरवर ज्वारीची पेरणी करतात आणि त्यांच्या जमिनीचा प्रकारानुसार ज्वारीचा वान निवडतात. पेरणीनंतर अन्नद्रव्य आणि कीड तसेच रोग व्यवस्थापन याबाबतीतही जामखेड तालुक्यातील शेतकरी जागरूक आहेत. त्यामुळे त्यांच्या कष्टातून उत्तम प्रतीच्या ज्वारीचे उत्पादन होते. इथल्या ज्वारीचा रंग पांढराशुभ्र असतो आणि खाण्यासाठी रुचकर असल्याने या ज्वारीला शहरी भागातून प्रचंड मागणी असते.

सध्या तालुक्यात ज्वारी काढणीला वेग आला असून, परिसरात भलरीचा आवाज घुमू लागला आहे. ज्वारी काढणीसाठी येणाऱ्या शेतमजूर दाम्पत्याला एक हजार रुपये हजेरी दिली जाते. त्यामुळे मजूरांना इथे रोजगार मिळतो. पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागात मोठ्या मॉलमधून 10 किलो पासून ते 50 किलो पर्यंतच्या ‘जामखेड ज्वारी’ चे पॅकिंग विक्रीसाठी उपलब्ध असते. इथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 20 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. कडब्याला अडीच ते तीन हजार रुपये शेकडा दर सुरू आहे. एकरी पंधरा ते सोळा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. ज्वारीचे एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळतात. एकरी खर्च 20 हजारांपर्यंत येतो, अशी माहिती येथील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

 

चौकट

ज्वारीसाठी इथलं वातावरण अनुकूल असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पिकं घेतलं जातं. अनुकूल वातावरण, स्थानिक आणि सुधारित जातींचे बियाणे, पेरणी हंगाम या सर्वांमुळे येथे ज्वारीचे उत्कृष्ट उत्पादन शेतकरी घेतात. जामखेड तालुक्यात बहुतांशी क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर अत्यल्प प्रमाणामध्ये केला जातो. काही ठिकाणी तर याचा वापरही केला जात नाही. त्यामुळे उत्पादित ज्वारीचा रंग आणि भाकरीचा स्वाद हा काही वेगळाच असतो. त्यामुळे जामखेडच्या ज्वारीला चांगली मागणी असते.

तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here