जामखेड न्युज——
कठीण परिस्थितीत डॉ.अल्ताफ शेख यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय – आमदार प्रा.राम शिंदे
गॅलॅक्सी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
आपल्या मुलाला उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते, ते परिपूर्ण करण्याचा यथायोग्य प्रयत्न गॅलॅक्सी इंग्लिश स्कूलच्या माध्यमांतून होतो आहे. या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याने दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे, कठीण परिस्थितीत उल्लेखनीय काम ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील गॅलॅक्सी इंग्लिश स्कूलमध्ये 17 रोजी सायंकाळी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रा राम शिंदे बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, परिविक्षाधीन गटविकास अधिकारी राजेश कदम, पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ. भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, प्रविणशेठ चोरडिया, भानुदास बोराटे,उदयसिंग पवार, बापूराव ढवळे, प्रशांत शिंदे, शंकरशेठ गदादे, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, उध्दव हुलगुंडे, सुनिल यादव, विशाल शिंदे, उमेश रोडे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की, शाळा काढणं आणि ती अनेक वर्षे चालवणं ही अतिशय अवघड बाब आहे, परंतू विपरीत परिस्थितीवर मात करत डाॅ अल्ताफ शेख आणि त्यांच्या परिवाराने माळरानावर शाळा उभी केली. शाळेमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचं काम केलं, इथं प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शाळेच्या परिसरात गार्डन सजवले तसेच संपूर्ण परिसर निसर्गरम्य करण्याचे काम केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.
मी मंत्री असताना या शाळेला मदत करायची भूमिका ठरवली, तशा प्रकारची घोषणाही केली, घोषणा केल्याच्यानंतर सगळ्यांना मिळते हा प्रत्यय आणि अनुभव आहे. परंतू गॅलॅक्सी इंग्लिश स्कूल या शाळेला शासकीय अनुदान नसल्यामुळे माझ्या वतीने शाळेला मदत शक्य झालं नाही, परंतू शाळेला मदत जरी केली नसली तरी अल्ताफच्या पाठीशी माझा माॅरल सपोर्ट आहे, हा माॅरल सपोर्टच खऱ्या अर्थाने महत्वाचाय, त्यामुळं तू शिक्षण देण्याचं, विद्यार्थी घडवण्याचं, पिढ्यान पिढ्या घडवण्याचं अतिशय पुण्याचं काम तुझ्या हातून होतयं, त्याच्यासाठी माझा माॅरल सपोर्ट आहे, पुढील कालखंडात जे काही लागेल ते निश्चित स्वरूपामध्ये मी देईन, असा शब्द देत आमदार प्रा राम शिंदे यांनी गॅलक्सी स्कुलचे संस्थापक डाॅ अल्ताफ शेख यांचे कार्याचे कौतुक केलं.
मी निवडणुकीला जरी हरलो असलो तरी पुन्हा आमदार झालो, आणि त्याचदिवशी सरकार आलं, केंद्रीय निवडणूक आयोगाने आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केलं, आणि म्हणून आपलं भविष्य चांगल्या पध्दतीने सुरूय, चांगल्या दिशेनं सुरूय, त्यामुळं लोकांना मदत करायची भावना, सहकार्य करायची भावना, अडचणीत, दु:खात साथ देण्याची भूमिका गेली अनेक वर्षे सार्वजनिक आणि राजकीय जीवनात केली. त्यामुळे अल्ताफ सारखे अनेक कार्यकर्ते तयार आणि निर्माण करण्याचा प्रयत्न मी केला. माझी संस्था या भावनेने मी नेहमी गॅलॅक्सी इंग्लिश स्कूल मदत करेन असे सांगत आमदार प्रा राम शिंदे पुढे म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या वाव देण्याचा शाळेचा जो निरंतर प्रयत्न सुरू तो कौतुकास्पद आहे.
यावेळी पार पडलेल्या स्नेहसंमेलनात आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी हळगाव पंचक्रोशीतील पालकवर्ग विशेषता: महिला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेतील बालगोपालांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पाहण्यात आमदार प्रा राम शिंदे तसेच त्यांचे चिरंजीव अजिंक्यराजे शिंदे तसेच उपस्थित पालक आणि प्रेक्षक चांगलेच रमले होते. बालगोपालांच्या कला सादरीकरणानंतर उपस्थितांकडून मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव केला जात होता. चार तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गॅलॅक्सी इंग्लिश स्कूलचे सर्व संचालक मंडळ, शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठी मेहनत घेतली.