जामखेड न्युज——
पोलिसांवर विश्वास व गुन्हेगारांवर वचक हा अजेंडा राबविणार – पोलीस अधीक्षक राकेश ओला

जिल्हा पोलीस प्रमुखाचा पदभार घेतल्यानंतर ते प्रथमच जामखेड शहरात आले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकार्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांवरील विश्वास वाढवणे व गुन्हेगारांवर वचक बसवणे हेच पोलीसांचे काम आहे तसेच तक्रारीची गंभीर दखल घेऊन शहरातील अवैध व्यवसायिकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांनी नवीन पोलीस वसाहतची पाहणी केली. येत्या काही दिवसांमध्ये वसाहत कार्यान्वित होणार आहे, याबाबत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या बरोबर चर्चा करून पोलीस स्टेशनच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर लवकरच उपायोजना करण्यात येईल असे सांगितले तसेच सर्व पोलीस स्टाफ बरोबर त्यांनी पोलीस खात्या अंतर्गत चर्चा करून सूचना केल्या.

२०१४ मध्ये नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली. त्यावेळी तोतया पोलिस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने नगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावला होता. जिल्ह्याच्या उत्तरेस वाळू तस्करांवरही त्यांनी कारवाया केल्या होत्या. मे २०१६ मध्ये त्यांची मालेगावला अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली. जून २०१७ ला नागपुरात पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्त झाले.
नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलिस बनून लुटणाऱ्या टोळीचा, तसेच कारची काच फोडून रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला होता. २०२१ पासून ते नागपूर येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत होते. ते कुल अधिकारी म्हणून ओळखले जातात.
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांचे स्वागत करण्यात आले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस उपनिरीक्षक कन्हेरे, सहायक फौजदार शिवाजीराव भोस,पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस नाईक साठे, पोलीस नाईक बाळासाहेब तागड, पोलीस नाईक संग्राम जाधव, पोलीस नाईक भागवत, पोलीस काँन्टेबल आबासाहेब आवारे, प्रकाश जाधव, संदिप आजबे, जाधव, अवी बेलेकर, कोठुळे, पोलीस काँन्टेबल सचिन पिरगळ सर्व पोलीस स्टाफ उपस्थित होते.





