जामखेड न्यूज—-
३ डिसेंबरला राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभागाची स्थापना होणार – राजेंद्र लाड
महाराष्ट्र राज्यात ३ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनी स्वतंत्र दिव्यांग विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक दिव्यांग भवन व पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ नोव्हेंबर २०२२ बुधवार रोजी मंत्रालयात माजी राज्यमंत्री आ. बच्चू भाऊ कडू यांच्या उपस्थितीत राज्यातील दिव्यांग संघटनांची बैठक संपन्न झाली. याच बैठकीत दिव्यांग कल्याणासंबंधी विविध निर्णय घेण्यात आले. अशी माहिती शासन मान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिव्यांग जनहितार्थ प्रसिद्धी माध्यमास दिली आहे.
या बैठकीस उपस्थित असलेले माजी राज्यमंत्री आ. बच्चू भाऊ कडू यांनी मंत्रालयात पत्रकारांना बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. आत्तापर्यंत दिव्यांगांचा विषय हा सामाजिक न्याय विभागातंर्गत राबविला जात होता. पण आता मंत्रालयात स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन होणार आहे. तसेच या स्वतंत्र दिव्यांग विभागाला स्वतंत्र सचिव आणि प्रशासकीय यंत्रणा दिली जाणार असून दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा पातळीवर दिव्यांग भवन व पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरील दिव्यांग भवन व पुनर्वसन केंद्रात विविध योजना एका छताखाली आणल्या जाणार आहेत.
तसेच राज्यातील दिव्यांगांची घरोघरी जावून नोंदणी करण्यात येणार असल्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे. तसेच दिव्यांगांना असलेल्या विविध सुविधा एकाच कार्डवर देण्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे.
सरकारी व खाजगी नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांच्या आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून प्रत्येक वसतिगृहातील तळ मजल्याच्या खोल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजना उभारली जाणार असून या योजनेला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा सततच माजी राज्यमंत्री आ. बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध दिव्यांग संघटना आजपर्यंत करत आलेल्या होत्या. आ. बच्चू भाऊ कडू यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करुन वरील सर्व मोठ्या निर्णयाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल राज्यातील सर्व दिव्यांग संघटनांनी त्यांचे तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे विशेष अभिनंदन करुन आभारही व्यक्त केले आहेत. असेही शेवटी राजेंद्र लाड म्हणाले.
—– चौकट ——-
दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री म्हणून आ. बच्चू भाऊ कडू यांना संधी मिळावी
राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची ३ डिसेंबरला घोषणा होणार असून या मंत्रालयाचे मंत्री म्हणून आ. बच्चू भाऊ कडू यांना संधी मिळावी. तसेच लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन व पुनर्वसन केंद्र उभारण्यात येवून त्यामधून दिव्यांग बांधवांचे खऱ्याअर्थाने प्रश्न मार्गी लागावेत. हीच आमच्या सर्व दिव्यांग बांधवांची मनोमन इच्छा…!!!
– राजेंद्र लाड ( जिल्हाध्यक्ष )म.रा.दिव्यांग कर्मचारी संघटना बीड