जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
श्रीज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त जामखेड शहरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी (दि.१८)एक दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायणात जास्तीत जास्त वाचकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षापासून श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने ह.भ.प. श्री विजय महाराज बागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एक दिवसीय श्री ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येते. त्यात शंभरहून अधिक वाचक सहभागी होतात. कोरोना काळामध्ये यामध्ये खंड पडला होता. येत्या शुक्रवारी ज्ञानेश्वरी जयंती आहे. परंतु नोकरदारवर्गाला व विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे म्हणून यावर्षी सुट्टीच्या दिवशी, रविवारी सकाळी सात वाजता या पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पारायणास परिसरातील जास्तीत जास्त वाचाकांनी सहभागी व्हावे येताना स्वतःचा ग्रंथ आणावा असे आवाहन पंढरीनाथ महाराज राजगुरु यांनी केले आहे.

जामखेड शहराच्या मुख्य बाजारपेठेत श्रीविठ्ठल रुक्मिणी पुरातन मंदिर आहे. सुमारे 55 वर्षांपूर्वी शहरातील भक्तांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर गेल्या पाच वर्षापूर्वी मंदिर समितीच्या पुढाकाराने व परिसरातील दानशूर भक्तांच्या सहकार्याने या मंदिराचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ती आहे. सभामंडपामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत नामदेव महाराज, संत संताजी जगनाडे महाराज, संत गाडगेबाबा, संत सावता महाराज, संत जळोजी महाराज, संत मळोजी महाराज, विश्वकर्मा या मूर्ती आहेत. शहराच्या मध्यवर्ती असलेले हे प्रशस्त व सुसज्ज मंदिर शहरातील भाविकांसाठी पारमार्थिक साधनेच्या दृष्टीने वरदान ठरले आहे.

येथे १७ वर्षापासून सकाळी महापूजा व विष्णू सहस्त्रनाम, दर सोमवारी व गुरुवारी भजन, प्रत्येक एकादशीला कीर्तन, संत सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या बीजोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, तसेच गेल्या २८ वर्षापासून मार्गशीर्ष महिन्यामध्ये भागवताचार्य श्री नंदकिशोरजी महाराज पुराणिक जालना यांची श्रीमदभागवत कथा, ५८ वर्षापासून श्रीकृष्ण जन्मानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह अशी वर्षभर मोठ्या उत्साहात कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पडतात. व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक यांना या ठिकाणी निमंत्रित केले जाते त्यामुळे येथील प्रत्येक कार्यक्रम हा भक्तांसाठी एक पर्वणीच असते.