खर्डा बस स्थानकातून भरदुपारी लाखो रुपयांचे दागिने लंपास

0
228
जामखेड न्युज——
खर्डा बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन एक लाख रुपयांची सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाली असून या संदर्भात जामखेड आगाराचे डेपो मॅनेजर यांचा जादा गाड्या न पाठवण्याचा हलगर्जीपणा नडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, खर्डा येथे सिताराम गडावर अखंड हरिनाम सप्ताह निमित्त काल्याच्या कीर्तनाचा समारोप 31 ऑगस्ट रोजी झाला, त्यामुळे खर्डा येथील सिताराम गडावर शेवटचे कीर्तन व महाप्रसाद घेण्यासाठी प्रचंड गर्दीचा उच्चांक झाला होता, मराठवाडा सहित अनेक गावातील भाविक भक्त या ठिकाणी आले होते त्यासाठी जामखेड आगाराचे डेपो मॅनेजर यांना खर्डा येथे जादा गाड्या पाठवण्याचा सूचना ग्रामस्थांनी केल्या होत्या परंतु डेपो मॅनेजर ने एकही जादा बस खर्डा बस स्थानकासाठी न सोडल्याने किर्तन व महाप्रसाद संपल्यानंतर खर्डा एसटी स्टँडवर प्रचंड गर्दी झाली होती, त्या गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी अंदाजे एक लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची फिर्याद खर्डा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मालन सोमीनाथ तागड वय 70 राहणार दिघोळ, तालुका. जामखेड. जिल्हा, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या गळ्यातील दहा ग्रामचे मंगळसूत्र दहा ग्रॅमचे डोरले अंदाजे किंमत 30000 रुपये तर त्या अगोदर पूनम बालाजी पाटील वय 26 वर्ष रा.माणकेश्वर, ता.भुम जिल्हा उस्मानाबाद यांच्या फिर्यादी वरून 15 ग्रॅमचे गंठण,चार ग्रॅमचे कानातील झुमके,पाच ग्रॅमचे अंगठी, दहा ग्रॅमची सोनसाखळी असा एकूण 65 हजार रुपये किमतीचे सोने चोरट्यांनी चोरून नेले आहे अशा प्रकारच्या दोन्ही महिलांचे एक लाख रुपये किमतीचे सोने आज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने खर्ड्यात मोठी खळबळ उडाली आहे, यासंदर्भात फिर्याद दोन्ही महिलांनी खर्डा पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.
खर्डा हे गाव तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेले शहर असून येथील व्यापारी पेठ श्री संत सीताराम गड, श्री संत गीते बाबा गड,खर्डा येथील ऐतिहासिक किल्ला, त्यासमोरील स्वराज्य ध्वज व परिसरात असणारी बारा ज्योतिर्लिंग मंदिरे मोठी नावारूपास आलेली आहेत व ती स्थळे पाहणयासाठी भाविक,पर्यटक येत असतात, त्यामुळे खर्डा बस स्थानकावर सतत गर्दी पहावयास मिळत आहे त्यासाठी या ठिकाणी जादा एसटी बसेस पाठवण्याची मागणी अनेकांनी जामखेड आगाराच्या डेपो मॅनेजर कडे केली होती परंतु त्यांच्या दुर्लक्षाने शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची सुविधा व प्रवाशांना सतत होणारा त्रास  सहन करावा लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून एसटी बसेसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी खर्डा बस स्थानकाला जादा बस पाठवण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सदर दाखल झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉ.एस जी धामणे पोलीस कॉन्स्टेबल आर के सय्यद, पोलिस काँ.शेषराव म्हस्के हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here