जामखेड न्युज—–

कर्जतमध्ये हर घर तिरंगा यात्रे अंतर्गत भाजपचे आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी दुचाकीवरून आज भव्य दिव्य तिरंगा रॅली काढली. या रॅलीत राम शिंदे यांनी डोक्यावर गांधी टोपी घालत बुलेट वरून कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला. राम शिंदे यांच्या या अस्सल ग्रामीण लूकची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कर्जत तालुक्यातील राशीन ते मिरजगाव दरम्यान मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रॉयल इन्फिल्ड बुलेटवर बसलेले रुबाबात बसलेले राम शिंदे.

पांढरा शर्ट, पांढरा पायजामा, डोक्यावर गांधी टोपी, बुलेटला लावलेला तिरंगा झेंडा असा अस्सल ग्रामीण पेहराव केले शिंदे बाईक रॅलीत सहभागी झाले. त्यांच्या मागे भाजपचे अनेक कार्यकर्ते, नागरिक दुचाकीवर हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देत होते.

रॅली सुरू होताना राम शिंदे यांनी कर्जतकरांना आवाहन केले की, भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपण हा उत्सव देशभरात साजरा करत आहोत. केंद्र सरकारने या संदर्भात प्रशासन व शासनाला निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने शासन व प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यात राशिन, कर्जत व मिरजगाव अशा ठिकाणी बाईक रॅलीचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, या रॅलीत पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले. विशेष करून अधिकारीही या रॅलीत सहभागी झाले. हा देश दीडशे वर्ष पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. त्यात स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदविला. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान व स्वाभिमान वाटावा त्यादृष्टी कोनातून हर घर तिरंगा लावण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. यात अनेक लोकांनी सहभागी व्हावे, या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आजी-माजी सैनिकांचाही सत्कार आज करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.