जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्यूज—–
बीडच्या पाटोदा तालुक्यातील हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या महाराजांचं पूर्ण नाव बुवासाहेब जिजाबा खाडे असं आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनी लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन खाडे महाराज यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. जून 2022 ते जुलै 2022 या काळात बलात्कार करण्यात आला, असा सनसनाटी आरोप पीडितेने खाडे यांच्यावर केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीमुळे बीडसह नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे खाडे यांनीही आपल्याला मारहाण झाली असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. मारहाण करुन आपल्याकडील सोन्याच्या ऐवज लुटण्यात आल्याचा दावा खाडे यांनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार पाच संशयितांविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संमतीशिवाय लैंगिक संबंध..?
पीडित महिलेलं आपल्या तक्रारीत, खाडे यांनी संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले असल्याचा आरोप केलाय. लग्न करण्याचं आमीष दाखवून आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोपही पीडितेनं केलेल आहे. गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खाडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

कोण आहेत खाडे महाराज?
बुवासाहेब जिजाबा खाडे हे हनुमानगड येथील मठाधिपती म्हणून ओळखले जातात. हनुमानगड हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात येतो. कुसळंब जवळ सुपा येथील डोंगरात अलिशान मठाचे काम केले आहे. महाराज अलिशान गाडीत फिरत असत तसेच अंगावर मोठ्या प्रमाणावर सोने घालून फिरत असत जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भक्त गण आहेत. काही वर्षांपूर्वी ऊसतोड कामगार असलेला महाराज आज कोट्यावधी रूपयांची कामे गडाच्या माध्यमातून केलेली आहेत.
जामखेड इथं खाडे महाराज यांचे अनेक भक्तगण असल्याचंही सांगितलं जातं. खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय.
खाडे महाराजांकडूनही पोलिसांना तक्रार
दरम्यान, आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी आणि लुटल्याप्रकरणी खाडे यांनी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. सोन्याची चैन, अंगठी, मणी अशी एकूण 13 लाख 60 हजार रुपयांची लूट झाली असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. त्यानुसार जामखेड तालुक्यातील मोहरीमध्ये राहणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल गीते, रामा गीते यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय.
या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या घटनेचा तपास करण्यासाठी आमची पथके तैनात आहेत. लवकरात लवकर सत्य बाहेर येईल.