भारतातील कृषी विद्यापीठांचा फायदा काय❓ अमेरिकेत एकरी तीस क्विंटल सोयाबीनचे उत्पादन भारतात का नाही -नितीन गडकरी

0
235
जामखेड न्युज——
अमेरिकेत एका एकरात 30 क्विंटल सोयाबीन होतं आणि आपल्या देशात 4 क्विंटलच्या वर नाही. मग कृषी विद्यापीठांचा काय फायदा? असा सवाल केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलाय. नागपुरात शुक्रवारी डॉ. सी.डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सहभागी झाले होते. यावेळी डॉ. सी. डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार कृषी अभ्यासक सुधिर भोंगळे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी सुधिर भोंगळे यांना देशातील पाण्याच्या समस्येवर (Water Crisis) काम करण्याचा सल्ला दिलाय.
‘नदी जोड प्रकल्पावर तुम्ही काम करा, मी सर्वतोपरी मदत करेल’
गडकरी म्हणाले की, धानाची शेती परवडत नाही तरी शेतकरी ती सोडायला तयार नाहीत, बदल करायला तयार नाहीत. कापसाला भाव बांग्लादेशमुळे मिळतोय. यावर्षी आपला कापूस बांग्लादेशात वर्ध्यातील पोर्टवरुन पाठवायचा आहे. बांग्लादेशमध्ये जाण्यासाठी मी रस्ते बनवले. त्यामुळे कापसाचं महत्व वाढेल, असा दावा गडकरी यांनी केलाय. अनेकांनी शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलं. पण शेतीवर कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत. 50 टक्क्यांच्यावर सिंचन झालं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. मी राज्यात सिंचन मंत्री असताना अनेक सिंचन प्रकल्पाचं काम केलं, त्यासाठी पैसे दिले. नदी जोड प्रकल्पावर तुम्ही काम करा, मी सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वासही गडकरींनी दिलाय. देशात 13 राज्यात पाण्यासाठी भांडणं होती ती मी सोडवली. आपल्या देशातील पाणी पाकिस्तानात जातं आणि आपल्या देशातील राज्य पाण्यासाठी लढतात. पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात वाया जातं, त्याचं नियोजन होत नाही, अशी खंत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलीय.
‘देशाची गरज भागवायची असेल तर पाण्याचं संचयन केलं पाहिजे’
शरद पवार यांनीही पाणी प्रश्नावर भाष्य केलं. देशाची गरज भागवायची असेल तर पाण्याचं संचयन केलं पाहिजे. ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. वैज्ञानिकांनी कृषी क्षेत्रात ज्या प्रमाणे काम केलं त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही केलं. मी कृषी मंत्री असताना माझ्यासमोर एक फाईल आली की गावातील पुरवठा करण्यात येणारा गहू संपत आला. तो अमेरिकेतून मागवावा लागेल. त्यावर मी खूप विचार केला आणि फाईल रोखून ठेवली. मात्र मनमोहन सिंग यांनी ती गरज असल्याचं सांगितलं आणि मला ती फाईल क्लिअर करावी लागली. मात्र, त्यानंतर आपल्या देशात संशोधन सुरु केलं आणि मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन वाढलं, असा एक किस्सा पवारांनी सांगितला. पवारांनी पुढे सांगितलं की, कृषी शास्त्रज्ञांच्या 5 हजार जागा खाली होत्या मग शेती कशी सुधारणार. त्यासाठी एक संस्था तयार केली आणि त्यात 5 हजार कृषी शास्त्रज्ञ आम्ही मायी यांच्यामार्फत तयार केले आणि त्यातून मोठं काम झालं, असा दावाही पवारांनी यावेळी केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here