जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील जवळा येथे आज आषाढी एकादशीपासून जवळेश्वर रथयात्रेची सुरुवात होत आहे.जवळेश्वर हे या गावचे जागृत देवस्थान मानले जाते. यात्रेला 110 वर्षांची परंपरा आहे.

पाच दिवस यात्रा चालते. आषाढी एकादशीपासून या यात्रेस प्रारंभ होतो. या यात्रेवेळी नृत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दहा ते अकरा मंडळाचे आयोजन केले जाते. जवळेश्वर मंदिरावर यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पौर्णिमेला जवळेश्वराची आरती करून मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. भाविक दर्शन घेऊन नारळाचे तोरण आपल्या इच्छेनुसार अर्पण करतात. यात्रेदिवशी भाविक नवस पूर्ण करतात .भाविकांनी दिलेले नारळाचे तोरण रथावर चढविले जाते. दुपारी आरती करून मंदिरासमोरून रथाची मिरवणूक मुख्य रस्त्यावरून जाते. रथाचे दोर बनवण्याचा मान जवळा येथील मते यांना आहे.
रथासमोर भजन- गायन करून हरिनामाचा गजर केला जातो. गावातील सर्व मंडळांचे नर्तिकांचे नाचगाण्याचे कार्यक्रमही रथासमोर चालू असतात. सायंकाळी रथ वेशीतून आत येतो. तेव्हा फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला जातो. मारुती मंदिरासमोर दहीहंडी घोडण्याचाही कार्यक्रम केला जातो.
भाविकांच्या दर्शनासाठी रथ काही वेळ थांबवला जातो. यावेळेत सर्व मंडळाचे नाचगाण्याचे कार्यक्रम थांबवून थोडी विश्रांती घेतली जाते. मध्यरात्रीपर्यंत रथ जवळेश्वर मंदिरासमोर येतो. या दरम्यान गावातील सर्व मंडळाच्या नर्तिका व वाद्यवृंद पथके जवळेश्वर मंदिर परिसराभोवती एकत्र येतात. त्यावेळी त्यांच्यात जुगलबंदी होते. रथ यात्रेची प्रथा अंदाजे 110वर्षांपूर्वीपासून असल्याचे सांगण्यात येते. जवळा हे पाच ऋषींचे गाव समजले जाते. जवळेश्वर, बाळेश्वर, काळेश्वर, बेलेश्वर, नंदकेश्वर अशी या पाच ऋषींची नावे. हे ऋषी प्रभू रामचंद्रापासूनचे मानले जातात. प्रभू रामचंद्राचे जामखेडजवळील सौताडा येथे वास्तव होते, असे मानले जाते.
त्याचवेळी हे पाच ऋषी प्रभू रामचंद्रांनी येथे स्थापित केले, अशी आख्यायिका आहे. पाच लिंगांपैकी एक जवळेश्वरचे हेमाडपंथी मंदिर आहे. बाळेश्वर आणि काळेश्वर हे गावातच आहेत. बेलेश्वर गावाच्या शेताच्या शिवारात असल्याचे मानले जाते. तर नंदकेश्वर हे लिंग पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेत असल्याची श्रद्धा आहे. जवळेश्वराचे मंदिर शके सतराशे सोळामध्ये बांधले आहे. मंदिराच्या शिखराचे काम मे 1996 मध्ये गावकऱ्यांनी देणगीच्या स्वरुपात पैसा गोळा करून केले.