जामखेड न्युज——
ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराज देवस्थानच्या नंदीचा वीजेचा करंट लागून मृत्यू झाला होता त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत नंदीची गावात मोठ्या भक्ती भावाने भजनाच्या साथीने मिरवणूक काढून नंदीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. संपूर्ण गावाने दहा दिवस सुतक पाळले होते. आज संपूर्ण गावाने नंदीचा दशक्रिया विधी केला. विशेष म्हणजे दशक्रिया विधी वेळी अनेक कावळे जमा झाले होते. नंदीची पिंडही शिवली. यामुळे मृत नदीला स्वर्गात शांती मिळेल अशी भावना ग्रामस्थांमध्ये होती.

आज साकत येथील नदीच्या पात्रात ग्रामस्थांनी दशक्रिया चा धार्मिक विधी पार पाडला यावेळी पोलीस पाटील महादेव वराट, भास्कर मुरूमकर सर, डॉ बाबु वराट, त्रिंबक पवार, बन्सी मुरूमकर, सतिश सांगळे, बाळू राक्षे, मधुकर भालेराव पुजारी यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

परिसरात प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकत गावात श्री साकेश्वर महाराज जागृत देवस्थान आहे. देवस्थानची 55 एकर सुपीक जमीन आहे. 

देवाचा नंदी आहे नंदीची संपूर्ण गावकरी मोठ्या भक्ती भावाने पुजा करतात यात्रेदिवशी व महाशिवरात्रीला पालखी सोहळा असतो यात नंदी सजवून भव्य दिव्य मिरवणूक असते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसे भक्ती भावाने नंदीची सेवा करतात. याच नंदीचा वीजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. आज मोठ्या भक्ती भावाने आज दशक्रिया विधी केला यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
.