जामखेड न्युज – – – –
तालुक्यातील साकत परिसर सोयाबीनचे आगार म्हणून ओळखले जाते. मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन होत आहे सोयाबीनला भावही चांगला मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते पण आता जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने सोयाबीन पेरणी खोळंबली आहे. पेरणीच नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जून महिन्यात पेरणी झाली नाही तर सोयाबीनचे आगार धोक्यात येणार आहे.
ADVERTISEMENT

सोयाबीनची पेरणी जून महिन्यात होणे आवश्यक आहे. जून महिन्यात पेरणी झाली तर पीक चांगले येऊन उत्पादनही चांगले निघते, रोगराई कमी पडते त्यामुळे जून महिना संपण्यास पाच दिवस राहिले आहेत तरीही पावसाचा पत्ता नाही. यामुळे पेरणी नाही यामुळे सोयाबीनचे आगार धोक्यात आले आहे.
जामखेड तालुक्यातील साकत परिसरातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन होते. लोकांनी तळ्यातील गाळ टाकून कसदार जमिनी तयार केल्या आहेत. पडिक जमिनी लागवडीखाली आणल्या आहेत. उन्हाळ्यात नांगरणी करून मोगडा पाळी केलेली आहे. पण अद्यापही पावसाचा मागमूसही नाही.
गेल्या वर्षी अवकाळी पाऊस तीन चार वेळा झाला होता. जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरणी झाली होती. यावेळी तर खुरपणी चालू होती. यामुळेच संपूर्ण परिसरात चांगले उत्पादन झाले होते. भावही चांगला होता व सध्याही चांगला आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आणखीही मोठ्या प्रमाणावर सोयाबीन शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. पण सध्या पेरणीच नाही यामुळे सोयाबीनचे कोठार धोक्यात आले आहे.
जून महिना संपत आला मृग नक्षत्र पुर्णपणे कोरडे गेले यामुळे सोयाबीन पेरणीस उशिर होत चालला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.