जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे वन विभागामार्फत झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामात ४० हजारांचा अपहार झाल्याचे लाचलुचपत विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात वन विभागाच्या तत्कालीन तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.
ADVERTISEMENT

रमेश गोविंद गोलेकर (वय ६३, तत्कालीन सहायक वन संरक्षक), संतोष आनंदा बोराडे (वय ६२ वर्ष, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी, जामखेड), महादेव भिमा राठोड (वय ५५, तत्कालीन वनपाल, जामखेड, सध्या नेमणूक- सामाजिक वनीकरण, शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. बोराडे व राठोड यांना अटक करण्यात आली आहे. डिसेंबर २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान हा प्रकार घडला.
महाराष्ट्र शासनाकडून जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामांची उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले होते. त्यामध्ये अरणगाव (ता. जामखेड) येथील गट नंबर २९४ मधील चर खोदण्याचे काम वनविभागामार्फत करण्यात आले. सदर कामामध्ये चौकशी दरम्यान प्रथम दर्शनी ४० हजार ७१७ रुपयांचा भ्रष्टाचार संगनमताने केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागामार्फत पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी तपास केला. पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, पोलिस हवालदार संतोष शिंदे, अंमलदार बाबासाहेब कराड, वैभव पांढरे, चालक हरुन शेख, राहुल डोळसे यांनी अटकेची कारवाई केली