धरण उषाला आणी कोरड जामखेडकरांच्या घशाला, धरणात पाणी असतानाही दहा दिवसातून एकदाच पाणी

0
241

जामखेड न्युज – – – –

    जामखेड शहराला सध्या आठ ते दहा दिवसांतून एकदा एक तास पाणी मिळत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात भरपूर पाणी असूनही शहरात पाणीबाणी आहे. शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही आहे. सतत पाईपलाईन नादुरुस्त होणे यामुळे पाण्याचे वेळापत्रक कोलमडत आहे. वर्षभरात फक्त चाळीस ते पन्नास दिवसच पाणी मिळते. उजणी धरणातून पाणीपुरवठा होणार हे मृगजळ ठरताना दिसत आहे. जेवढे दिवस पाणी मिळते तेवढीच पाणीपट्टी घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 
   एके काळी चोवीस तास पाणी पुरवठा होणारे शहर म्हणून जामखेड शहराची झपाटय़ाने वाढ करण्यात झाली १९७२ साली झालेली योजना आजही तशीच आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली त्यामुळे पाईपलाईन वर मोठा ताण निर्माण होत आहे. पाईपलाईन वारंवार नादुरूस्त होत आहे त्यामुळे आठ दिवसांनी मिळणारे पाणी दहा ते बारा दिवसांवर जाते. 
   नगरपरिषद ३६५ दिवसांची पाणी पट्टी वसुल करते पण पाणी मात्र वर्षभरात फक्त चाळीस ते पन्नास दिवसच मिळते तसेच शहरात काही प्रभागात अनेक गैरसोयींचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. बंदिस्त गटारांची सोय नाही नीट रस्ते नाहीत तसेच मोकाट जनावरे कुत्रे, डुकरे, यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 
    सध्या जामखेड शहरात आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो पण वारंवार पाईपलाईन नादुरुस्त होणे यामुळे सतत पाणी पुरवठा करणारा दिवस मागेपुढे होतात वास्तविक पाहता नगरपरिषद प्रशासनाने याबाबत नागरिकांना कल्पना देणे अपेक्षित आहे पण कसलाही कल्पना दिली जात नाही त्यामुळे पाणी आता येईल मग येईल म्हणून नागरिकांना नळाजवळ बसून राहावे लागत आहे. 
    शहराला सध्या भुतवडा तलावातून पाणीपुरवठा होत आहे भुतवडा जुना तलाव पाणीसाठवणूक क्षमता ११९ दशलक्ष घनफूट आहे. सध्या तलावात ५१.३१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे उपयुक्त पाणीसाठा ३१.६२ टक्के आहे. तसेच भुतवडा जोडतलावाची पाणीसाठवणूक क्षमता ४८.२५ दशलक्ष घनफूट आहे सध्या ९.०१ दशलक्ष पाणीसाठा आहे उपयुक्त टक्केवारी १४.७५ आहे म्हणजे दोन्ही तलावाचा विचार करता ४५ टक्के पाणी साठा असतानाही शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 
भुतवडा तलावातील पाणी शहराला कमी पडते म्हणून पाच वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी उजणी धरणातून १०६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. नंतर सत्ता बदलली आमदार रोहित पवारांनी या योजनेचा नीट अभ्यास केला यात अनेक त्रुटी होत्या काही भाग वगळला होता तेव्हा १३९ कोटी रुपयांची सुधारीत आराखडा मंजूरी आणली असे आमदार रोहित पवारांनी सांगितले पण सध्या तरी आणखी काम सुरू नाही शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उजणी योजना कधी होणार याकडे जनता डोळे लावून बसली आहे सध्या तरी ते मृगजळ ठरत आहे. 
  
   चौकट 
  जामखेड शहरात मोठय़ा प्रमाणावर अनाधिकृत नळ कनेक्शन आहेत. अनेक अधिकारी, पदाधिकारी यांच्या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत नळ कनेक्शन व मेन लाईनला नळ कनेक्शन आहेत. अधिकृत नळ कनेक्शन वाल्यांना पाणी पट्टी भरून दहा दिवसांतून एकदा एक तास पाणी तर अनाधिकृत नळ कनेक्शन वाल्यांना मोफत मुबलक पाणी अनाधिकृत नळ कनेक्शन शोधुन तसेच मुख्य लाईनला असणारे नळ कनेक्शन कट केले तर शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here