आमदार रोहित पवारांनी आघाडीचा धर्म पाळावा – खासदार गजानन कीर्तिकर , अन्यथा शिवसैनिकही आपणास बांधिल राहणार नाहीत

0
306
जामखेड प्रतिनिधी
            जामखेड न्युज – – – – 
आमदार रोहित पवार यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही आपणास बांधिल राहणार नाहीत असा इशारा शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी कर्जत येथे बोलताना दिला आहे.
शिवसेनेचे शिव संपर्क अभियान टप्पा 2 याचा शुभारंभ आज कर्जत येथे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय धाडी,  महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख अश्विनी मते, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महिला जिल्हा संघटक मंगल मस्के, उपजिल्हा संघटक चंदनबाला बोरा, तालुकाप्रमुख बळीराम यादव, जामखेड तालुका प्रमुख संजय काशीद, महिला आघाडीच्या मंदाकिनी कुलकर्णी, शिवसेना नेते अमृत लिंगडे, व्यापारी आघाडीचे प्रमुख महावीर शेठ बोरा, उपतालुकाप्रमुख सुभाष जाधव, चंद्रकांत घालमे, संजय शेलार, युवा सेनेचे तालुका प्रमुख दीपक गांगर्डे, शिवाजी नवले, बाळासाहेब निंबोरे, डॉ नितीन तोरडमल, शहरप्रमुख अक्षय तोरडमल , पोपट धनवडे, सुलोचना दोषी यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.शिव संपर्क अभियान कर्जतमध्ये आज मोठ्या उत्साहात याठिकाणी सुरू झाले. प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना संपर्क अभियान टप्पा 2 ते सुरू केले आहे. यानिमित्ताने शिवसैनिकांशी त्यांच्या असणाऱ्या अडचणी , समस्या याबाबत संवाद साधण्यात येणार आहे. तसेच आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गाव वाडीवस्तीवर शिवसेनेच्या शाखा काढण्यात येतील.
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर मात्र त्यांनी यावेळी मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना विश्वासात घेत नसल्याबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की राज्यामध्ये महा विकास आघाडी तयार करण्यामध्ये त्यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. आमदार रोहित पवार यांना देखील राजकारणात मोठा टप्पा आणखी गाठावयाचा आहे. आपण शरद पवार यांचे नातू आहात, आपल्याला मोठी परंपरा आहे व त्याची जाण राजकारण करताना ठेवण्याची आवश्यकता आहे . त्यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी.
 जिल्हा नियोजन समितीचा निधी मध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. त्याचप्रमाणे मतदार संघामध्ये होणाऱ्या विकास कामांमध्ये देखील शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे. या ठिकाणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात  आपण आघाडीचे प्रमुख असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांना या सर्व बाबी लेखी पत्राने कळवणार आहोत असे देखील या ठिकाणी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख संजय घाडी म्हणाले की, खासदार गजानन कीर्तिकर हे स्थानिक लोकाधिकार समितीचे शिल्पकार आहे. शिवसैनिकांना जास्तीत जास्त अधिकार देण्यासंदर्भात हे संपर्क अभियान सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झाले आहे ती परंपरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पुढे सुरू ठेवली आहे. मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांनी ज्या समस्या अडचणी व त्यांची  मतदारसंघांमध्ये होत असलेले अडवणूक या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सर्व लेखी अहवाल देणार आहे.  असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी अमृत लिंगडे ,सुभाष जाधव, पोपट धनवडे ,शिवाजी नवले, दीपक गांगर्डे व मंगेश राऊत यांनी मतदार संघामध्ये काम करताना शिवसैनिकांची होत असलेली अडवणूक याबद्दल भाषणे केली.
यावेळी अश्विनी मते व राजेंद्र दळवी यांची ही भाषणे झाली आभार हरी बाबर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here