इंदुरीकर महाराज पुन्हा गोत्यात? वादग्रस्त वक्तव्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता

0
215
जामखेड न्युज – – – – 
कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकवेळा अडचणीत येत असतात. दरम्यान, पुण्यातील दोघांनी इंदूरीकर महाराज यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांच्या तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी इंदुरीकर यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
अकोला येथे इंदुरीकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला होता. आपल्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील, असं विधान त्यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असून त्यांनी अकोले पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.इंदुरीकर यांच्या किर्तनाची आसपास चौकशी करावी आणि त्यात ते दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९२ (अ) नुसार त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, असा आदेश आयुक्त देशमुख यांनी दिला आहे. यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांवर इंदुरीकर महाराजांनी या आधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपर्वीही अंधश्रद्धा निर्मुलन समिती इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक झाली होती. समितीने इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्यांना इंदुरीकरांना दिलासा देत त्यांच्या विरोधातील खटला रद्द केला. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here