शिल्लक ऊस पेटवून देत शेतकऱ्याची आत्महत्या  

0
200
जामखेड न्युज – – – – 
गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकऱ्याने ऊस गाळपास जात नसल्याने नैराश्यात होते. त्यामुळे शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिंगणगाव येथे उघडकीस आली आहे.
नामदेव आसाराम जाधव ( 32 ) मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
नामदेव आसाराम जाधव तालुक्यातील हिंगणगाव येथे राहत. त्यांन गाव शिवारात ३ एकर शेत जमीन आहे. यातील १ एकर शेतात जाधव यांनी उसाची लागवड केली होती. मात्र, गळीत हंगाम संपत आला तरीही जाधव यांचा ऊस शेतातच होता. गाळपाला जात नसलेला ऊस जागेवरच राहिल्याने वजन घटत होते, शिवाय त्याच्यावर केलेला खर्च कसा निघणार याच्या विवंचनेत जाधव होते.
दरम्यान, आज सकाळी जाधव शेतात गेले. येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास जाधव यांनी शेतातील उभ्या ऊसाला आग लावली. त्यानंतर शेतातच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जाधव यांनी आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ऊस जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पुढे गंभीर समस्या उभ्या आहेत. जाधव यांची आत्महत्या झाल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर वळणावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार जाधव यांच्याकडे बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज होते. जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here