जामखेड न्युज – – –
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा सुरू असतानाच अजान सुरू झाल्याने काही काळ सभास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांना विनंती करत आत्ताच्या आत्ता तोंडात बोळा कोंबावा, असं मत व्यक्त केलं. तसेच सरळसरळ मार्गाने समजत नसेल, तर मग त्यानंतर जे होईल ते मला माहिती नाही, असं म्हणत गंभीर इशारा दिला.
राज ठाकरे म्हणाले, “माझी पोलिसांना नम्र विनंती आहे जर हे सभेच्यावेळी बांग सुरू करणार असतील तर आपण आत्ताच्या आत्ता ताबोडतोब तोंडात बोळा कोंबावा. सरळसरळ मार्गाने समजत नसेल, तर मग त्यानंतर होईल मला माहिती नाही. इथं जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय त्यांनी आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा.”
“पोलिसांना विनंती आहे यांची थोबाडं पहिल्यांदा बंद करा”
“जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे. तुम्ही अजिबात शांत बसता कामा नये. संभाजीनगरच्या पोलिसांनी मी पुन्हा विनंती करतोय. हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे यांना पुन्हा एकदा दाखवावीच लागेल. म्हणून पोलिसांना विनंती आहे यांची थोबाडं पहिल्यांदा बंद करा,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
“संपूर्ण देशातील हिंदूंना माझी विनंती आहे की मागचा पुढचा अजिबात विचार करू नका, हे भोंगे उतरलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजे, पण मशिदींवरील भोंगे उतरल्यानंतर मंदिरांवरील भोंगे उतरवले जातील,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.





