जामखेड न्युज – – –
नागपूर-मुंबई या एक्स्प्रेस हायवेचे शिर्डीपर्यंच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून तो लवकरच खुला होणार आहे. याच दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल औरंगाबादमध्ये आणखी एका एक्स्प्रेस हायवेची घोषणा केली.
हा एक्स्प्रेस हायवेही अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे. यामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वा तासात कापता येणार असल्याचा दावा गडकरी यांनी केला आहे. मात्र, याचा नगरला किती उपयोग होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
गडकरी यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. त्यामध्ये बोलताना त्यांनी या नव्या मर्गाची घोषणा केली. औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) दहा हजार कोटी रुपये खर्चाचा असून तो पैठण, बीड आणि अहमदनगर या भागातून जाणार आहे. या महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वा तासात पार करता येणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
औरंगाबादहून पैठण, शेवगाव, पाथर्डी, नगर तालुका, पारनेर तालुका या भागातून हा एक्स्प्रेस हायवे जाणार आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार त्याला मध्ये कोठेही थांबा असणार नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यातून यावर जाता येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. आधीच जिल्ह्यात रस्त्याची विविध कामे सुरू असून त्यासाठीच्या भूसंपादनाला अनेक ठिकाणी विरोधही होत आहे.