जामखेड न्युज – – – –
कर्जत-जामखेड तालुक्यातील भाविकांना पंढरपूरमध्ये हक्काची जागा असावी तसेच महिन्याला वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी पंढरपूरमध्ये संत छाया भक्तिनिवास उभारण्यात येणार आहे. संतांच्या विचारातून शिक्षण, सहकार, आरोग्य, पर्यावरणावर आम्ही काम करीत आहोत. , पंढरपूरमध्ये भक्तिनिवास उभारुन संतांच्या मानवतावादी विचारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या संतछाया भक्त निवासाचे भूमिपूजन गुरुवारी महाराष्ट्रातील सर्व संतपिठाचे मान्यवर, मतदारसंघातील आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे वारकरी संप्रदायाचे मान्यवर व पंढरपूरमधील विविध मठाचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्वतः आ. रोहित पवार ही उपस्थित होते.
कर्जत व जामखेड तालुक्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून नागरिक व वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येत असतात. त्यांची राहण्याची गैरसोय होऊ नये या उद्देशाने व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर येथे संतछाया याभव्य व सुसज्ज भक्त निवासाची उभारणी करण्यात येत आहे.
या भक्तनिवासाच्या भूमिपूजन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. पवार म्हणाले, संतविचारांवर आधारलेला वारकरी संप्रदाय समाजाला एकी आणि समानतेची शिकवण देणारा आहे. कोणीही उच्च-नीच नाही. सर्व समान आहे, हा विचार केवळ वारकरी संप्रदाय देतो. संत ज्ञानेश्रर महाराजांनी पसायदानात दिलेला परोपकाराचा विचार जगाला तारक आहेत. तर संसार करून परमार्थ करण्याचा संत तुकाराम महाराजांचा संदेश जीवन कृतार्थ करणारा आहे. कर्जत-जामखेडकरांसाठी हक्काची जागा उपलब्ध होईल. या भक्तनिवासाचे व्यवस्थापन कर्जत-जामखेडमधील १० कीर्तनकार पाहतील व समस्त वारकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
यावेळी चोपदार यांनी बोलताना म्हटले, मतदारसंघातील भाविकांसाठी भक्तनिवास उभारण्याबरोबर अन्य वारकऱ्यांनाही त्याचा लाभ घेता येईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी वारकऱ्यांप्रती उदार धोरण स्वीकारले आहे. तसेच येथे येणाऱ्या वारकऱ्यांनी चंद्रभागा स्वच्छ कशी ठेवता येईल, याबाबत जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त असलेल्या वडाच्या झाडाचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चौकट
असा आमदार सर्व मतदारसंघांना मिळावा
आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील वारकऱ्यांसाठी भक्तनिवास बांधण्याचा अनोखा उपक्रम येथे राबविला आहे. त्यामुळे आज प्रत्येक वारकऱ्याला असे वाटत असेल की आपण या मतदारसंघात का जन्माला आलो नाही. रोहित पवार यांचा आदर्श अन्य आमदारांनीही घ्यावा. प्रत्येक मतदारसंघानिहाय भक्तनिवासाची व्यवस्था संबंधित आमदारांनी घेतली तर पंढरपूरकरांवरील ताण कमी होईल. तसेच त्यांना हक्काची जागा मिळेल. तसेच महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या हस्ते भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्याची संकल्पना राज्यात प्रथम येथे राबविली गेली आहे. यातून वारकऱ्याप्रती असलेला भक्तिभाव दिसून येतो.