जामखेड न्युज – – –
आतापर्यंत आपण काचेच्या पुलाचे विदेशातले अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिले असतील. अनेकांचं तिथे जाण्याचं स्वप्न देखील असेल तर आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण काचेचा पूल आता चक्क अहमदनगर जिल्ह्यात तयार होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हे एक मोठे पर्यटन स्थळ मानले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात,त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काचेचा हा पूल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल रंधा धबधबा येथे होणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपये अर्थ संकल्पत मंजूर झाले आहेत. त्यापैकी अडीच कोटीचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतात सहा ठिकाणी काचेचे पूल आहेत. मात्र महाराष्ट्रात काचेचा पूल नाही. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल तयार करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) एका आमदाराने राज्याच्या अर्थसंकल्पातून 5 कोटी रूपये मंजूर करून आणला आहे.
याबाबत बोलताना आमदार लहामटे पुढे म्हणाले की, अकोले तालुक्यातील पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अकोले तालुक्यात रंधा धबधबा येथे लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी पैकी 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झालेला आहे.
आजपर्यंत अकोले तालुक्यात भरपूर निधी आणला असून यापुढे ही तो आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले. रंधा धबधबा येथे होणारा काचेचा पूल हा महाराष्टातील पहिला पूल असून देशातील 6 वा पूल आहे. घाटनदेवी चौंढ घाटसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्या बाबत ही निर्णय होईल तसेच शहापूर चौंढ रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी होणार आहे.
भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात. येथे घोरपडा देवीचे मंदिर आहे.
रंधा धबधबा म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच. रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणे घेत २०कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 5० मीटर खोल दरीत झेपावते.
त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्र मंगल कल्लोळ, पाण्याचा तो शुभ्र धवल झोत, तुषारांचे वैभव अन त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनू, तेथील निरव शांततेला भेदणारा प्रपाताचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळेच संगीतमय वातावरण निर्माण होते.
पावसाळ्यात तर रंधा धबधबा आणखीनच रौद्र रूप धारण करतो. पण त्याचवेळी त्याठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण झालेली असते. पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागुनच दुस-या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो.