जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
दर्जेदार कवितेचा सन्मान करून नवोदितांना घडविण्याचे कार्य जामखेडचे मराठी साहित्य प्रतिष्ठान करीत आहे. प्रतिवर्षी कविसंमेलन घेणे व राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करून मराठी भाषा श्रीमंत करण्याचे कार्य जामखेडचे मराठी साहित्य प्रतिष्ठान करीत असल्याने आम्हा लेखक कवींना हे तीर्थ क्षेत्र वाटते ”असे विचार कविसंमेलनाचेअध्यक्ष सुप्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे वतीने नुकतेच चांदणझुला कविसंमेलन बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, त्याप्रसंगीच्या भाषणात ते बोलत होते.याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरूवातीस अनिल अडसूळ यांनी मधुर बासरी वादनाने उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख अतिथी व कवी सौदागर यांच्या हस्ते संत तुकारामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. मधुकर राळेभात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून तहसीलदार चंद्रे व पी.आय. गायकवाड यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी प्रा.आ.य.पवार यांनी कवी सौदागर यांचा सत्कार केला. सदस्य कवी कुंडल राळेभात व डॉ जतीन काजळे यांनी कवी शंकर वाडेवाले(नांदेड) , हनुमंत चांदगुडे, पुणे, हरिश्चंद्र पाटील सोलापूर, नागेश शेलार, इंद्रकुमार झांजे ( बीड) आदी कवींना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी जामखेड येथील पत्रकार सुदाम वराट व दीपक देवमाने यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल
प्रतिष्ठानचे वतीने प्रमुख अतिथी व डॉ विद्या काशीद यांच्या हस्ते राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
यांचा श्री गुलाबराव जांभळे व प्रा.राळेभात यांनी फेटा बांधून गौरव केला. यानंतर सुप्रसिद्ध कवी बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली अडीच तासांचे बहारदार कविसंमेलन चंद्र प्रकाशात संपन्न झाले. प्रसिद्ध कवी शंकर वाडेवाले व हनुमंत चांदगुडे यांनी चांदणझुल्याचे सूत्रसंचालन केले.प्रेम, विनोद,कोरोना , कृषी व समाज जीवन इ. विषयावरील कवितामुळे कविसंमेलनात श्रोते
मंत्रमुग्ध झाले होते. प्रा.मोहनराव डुचे व सरसमकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. बहुसंख्य काव्यरसिक कविसंमेलनास उपस्थित होते.