Sunday, September 27, 2026
Home राजकारण दुष्काळात राजकारण नाही, शेतकरीच मोठा! अहिल्यानगर जिल्हा बँक बिनविरोध होणार, संगमनेरात सर्वपक्षीय...

दुष्काळात राजकारण नाही, शेतकरीच मोठा! अहिल्यानगर जिल्हा बँक बिनविरोध होणार, संगमनेरात सर्वपक्षीय नेत्यांची ऐतिहासिक एकजूट!

0
2
दुष्काळात राजकारण नाही, शेतकरीच मोठा! अहिल्यानगर जिल्हा बँक बिनविरोध होणार, संगमनेरात सर्वपक्षीय नेत्यांची ऐतिहासिक एकजूट!

जामखेड न्युज – – – – – 

दुष्काळात राजकारण नाही, शेतकरीच मोठा! अहिल्यानगर जिल्हा बँक बिनविरोध होणार, संगमनेरात सर्वपक्षीय नेत्यांची ऐतिहासिक एकजूट!

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची गुप्त बैठक संपन्न झाली. कट्टर राजकीय विरोधक विखे – थोरात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. 

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने आणि जिल्हा बँकेच्या व्यापक हिताचा विचार करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. संगमनेर येथे झालेल्या बैठकीत ही भूमिका सामूहिकपणे व्यक्त करण्यात आली.

ए

जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी विविध अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीतील राजकीय चुरस आणि त्यातून होणारा खर्च टाळून जिल्हा बँकेच्या कारभारावर व सहकार क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे बैठकीत मांडण्यात आले.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, विविध सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सहकार क्षेत्राच्या व्यापक हिताचा विचार करावा, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली. बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर
संगमनेर येथील बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे तसेच ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते व प्रतापसिंह पाचपुते आदी उपस्थित होते.

आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीस उपस्थित राहून बिनविरोध निवडणुकीच्या सकारात्मक भूमिकेला पाठिंबा दर्शविला.
अनुपस्थित नेत्यांशीही संपर्क साधणार
बैठकीस उपस्थित राहू न शकलेल्या तसेच अद्याप संपर्क न झालेल्या नेत्यांशी समन्वय साधून त्यांनाही या भूमिकेसोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हा बँक निवडणूक समितीने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्व समविचारी मंडळींनी एकत्र येऊन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक व सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करावे, हीच बैठकीची सामूहिक भूमिका असल्याचे समितीने सांगितले.
दरम्यान, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन यापूर्वी केले आहे. शेतकरी आणि बँकेच्या आर्थिक हिताला राजकीय प्रतिष्ठेपेक्षा प्राधान्य द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे.
त्यामुळे आता जिल्हा बँकेची निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सर्वपक्षीय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पुढील काळात जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीबाबत कोणता समन्वय साधला जातो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक वेळापत्रक
उमेदवारी अर्ज दाखल करणे : 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर

अर्जांची छाननी : 6 ऑक्टोबर

अर्ज मागे घेण्याची मुदत : 7 ते 21 ऑक्टोबर

निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : 22 ऑक्टोबर

मतदान : 2 नोव्हेंबर

मतमोजणी : 3 नोव्हेंबर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!