Saturday, October 31, 2026
Home क्राईम न्यूज जरांगे पाटलांच्या फोटोवरून WhatsApp स्टेटसचा भडका! मेसेज-फोन संभाषणानंतर थेट खर्डा पोलिसांत तक्रार

जरांगे पाटलांच्या फोटोवरून WhatsApp स्टेटसचा भडका! मेसेज-फोन संभाषणानंतर थेट खर्डा पोलिसांत तक्रार

0
111
जरांगे पाटलांच्या फोटोवरून WhatsApp स्टेटसचा भडका! मेसेज-फोन संभाषणानंतर थेट खर्डा पोलिसांत तक्रार

जामखेड न्युज – – – – – 

जरांगे पाटलांच्या फोटोवरून WhatsApp स्टेटसचा भडका! मेसेज-फोन संभाषणानंतर थेट खर्डा पोलिसांत तक्रार

मनोज जरांगे पाटील यांच्या छायाचित्राचा वापर करून WhatsApp वर ठेवण्यात आलेल्या स्टेटसमुळे जामखेड तालुक्यातील नायगाव येथे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी नायगाव येथील २५ वर्षीय युवकाने खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सतेवाडी येथील विठ्ठल बापू तोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडील FIR नुसार, तक्रारदार युवकाने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ११ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास तो घरी असताना WhatsApp वरील स्टेटस पाहत होता. त्यावेळी एका व्यक्तीच्या WhatsApp स्टेटसमध्ये देशी दारूच्या दुकानाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला मजकूर आणि त्यासोबत काही इमोजी असल्याचे त्याने पाहिले.

या स्टेटसबाबत तक्रारदाराने संबंधित व्यक्तीला WhatsApp वर संदेश पाठवला. त्यानंतर दोघांमध्ये संदेशांची देवाणघेवाण झाली. पुढे तक्रारदाराने संबंधित व्यक्तीशी फोनवरूनही संपर्क साधला. या संभाषणादरम्यान स्टेटस ठेवण्याबाबत विचारणा करण्यात आली. संबंधित व्यक्तीने स्टेटस ठेवणे ही आपली मर्जी असल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यानंतर तक्रारदाराने पुन्हा संबंधित WhatsApp स्टेटस पाहिले असता ते डिलीट करण्यात आल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या स्टेटसमधून जातीय द्वेष तसेच जातीजातीमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्याने खर्डा पोलिसांकडे केली.

तक्रारीच्या आधारे खर्डा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0159/2026 दाखल करण्यात आला आहे. FIR मध्ये भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 353(2) आणि 356 अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे कागदपत्रात नमूद आहे.

१२ सप्टेंबर रोजी पहाटे १.०५ वाजता पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पहाटे १.११ वाजता FIR नोंदवण्यात आल्याचेही कागदपत्रावरून दिसून येते.

दरम्यान, सोशल मीडियावरील पोस्ट, स्टेटस किंवा संदेशांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी जबाबदारीने सोशल मीडिया वापरण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.

 

चौकट

सोशल मीडियावर कोणत्याही महापुरुषाबाबत किंवा जातीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट ठेवू नये, त्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते.

(सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!