Sunday, August 30, 2026
Home क्राईम न्यूज लोणी फाट्यावर ‘तिरट’चा डाव पोलिसांनी केला उद्ध्वस्त! हॉटेलच्या आडोशातील जुगार अड्ड्यावर छापा;...

लोणी फाट्यावर ‘तिरट’चा डाव पोलिसांनी केला उद्ध्वस्त! हॉटेलच्या आडोशातील जुगार अड्ड्यावर छापा; सहा जण ताब्यात

0
2
लोणी फाट्यावर ‘तिरट’चा डाव पोलिसांनी केला उद्ध्वस्त! हॉटेलच्या आडोशातील जुगार अड्ड्यावर छापा; सहा जण ताब्यात

जामखेड न्युज – – – – – 

लोणी फाट्यावर ‘तिरट’चा डाव पोलिसांनी केला उद्ध्वस्त! हॉटेलच्या आडोशातील जुगार अड्ड्यावर छापा, सहा जण ताब्यात

 

खर्डा-जामखेड रस्त्यावरील लोणी फाटा येथे हॉटेल ओम साईच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगाराच्या डावावर खर्डा पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. यावेळी पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश कर्डिले व खर्डा पोलिसांचे पथक शुक्रवारी अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोहेकॉ. अरुण गांगुर्डे यांना लोणी फाटा परिसरातील हॉटेल ओम साईच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये बाबु केकाण हा विनापरवाना तिरट जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांना सोबत घेत रात्री सुमारे १०.४५ वाजता संबंधित शेडवर छापा टाकला. यावेळी काही जण गोलाकार बसून पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता बाबु अर्जुन केकाण (२८, रा. दरडवाडी), राहुल राजेंद्र पवार (२७, रा. बांदखडक), तानाजी खंडेराव पुंदे (४५, रा. बांधखडक), अनिल वैजीनाथ दराडे (३०, रा. दरडवाडी), गणेश लक्ष्मण गिते (२३, रा. गीतेवस्ती, आनंदवाडी) आणि भरत अंकुश गिते (३४, रा. आनंदवाडी) अशी त्यांची नावे समोर आली.

रोख रक्कम, मोबाईल अन् पत्ते जप्त

पोलिसांच्या झडतीत बाबु केकाण याच्याकडून २२०० रुपये, राहुल पवार याच्याकडून ९०० रुपये, तानाजी पुंदे याच्याकडून ११०० रुपये व विवो कंपनीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, अनिल दराडे याच्याकडून ९५० रुपये व विवो कंपनीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल मिळाला.

गणेश गिते याच्याकडून ७६० रुपये व एक हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा मोबाईल, तर भरत गिते याच्याकडून १२०० रुपये रोख मिळाली. याशिवाय जुगाराच्या डावातील १५०० रुपये रोख व पत्ते असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या कारवाईत एकूण २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश कर्डिले यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार रावसाहेब दशरथ नागरगोजे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!