जामखेड न्युज – – – – –
जामखेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला, तीन जनावरांची सुटका
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला ताब्यात
जामखेड शहरातील मोहंमदीया मस्जिदजवळ पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी सकलेन कदीर कुरेशी (वय २४, रा. कुरेशी मोहल्ला, जामखेड) याला ताब्यात घेतले असून, दोन गायी व एका वासरासह एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे तसेच कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते.

दरम्यान, ७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना, मोहंमदीया मस्जिदजवळील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी शेडमध्ये एक व्यक्ती आणि तीन गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी सकलेन कदीर कुरेशी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.



