अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलिसांनी मानवी आरोग्यास अपायकारक व विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ड्रग्ज इंजेक्शन विरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५८,६४० रुपयांचे ७७ इंजेक्शन जप्त केले आहेत. या कारवाईमुळे मिरजगाव पोलीसांचे कौतुक होत आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरजगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, पप्पू उर्फ प्रविण लाला भोसले (रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत) हा MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या नावाचे इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्रीसाठी पुरवत आहे. हे इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय विक्रीस बंदी असून त्याचा गैरवापर नशेसाठी तसेच स्टॅमिना वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाभुळगाव खालसा येथे सापळा रचून रोहन भाऊसाहेब लाडाणे (वय २२) याची झडती घेतली असता त्याच्याकडून संबंधित इंजेक्शन आढळून आले.त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रविण भोसले यांच्या घराची झडती घेतली. या कारवाईत एकूण ७७ ड्रग्ज इंजेक्शन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी रोहन लाडाणे व प्रविण उर्फ पप्पू लाला भोसले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, १२५, २७८ तसेच औषधिद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० मधील कलम १८(सी), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी प्रविण भोसले सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईबद्दल मिरजगाव व बाभुळगाव खालसा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच अशा प्रकारच्या प्रतिबंधित ड्रग्ज किंवा अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन मिरजगाव पोलिस स्टेशनकडून करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या पथकाने केली आहे. या धडाकेबाज कारवाई मुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईबद्दल जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण व जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांनी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचे अभिनंदन केले.
चौकट जिल्ह्यातील पहिलीच प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शनची कारवाई आहे. अनेक मेडिकल दुकानदार सर्रास पणे या ड्रग्ज ची राजरोस पणे विक्री करतात. आता या मेडिकल वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईबद्दल मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचे कौतुक होत आहे.