सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या तत्परतेने वाचले १७ वर्षीय तरुणाचे प्राण
शहरातील बीड रोडवर रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण मोटरसायकल अपघातात वीर अनिल सरकटे, वय १७ हा तरुण गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे जीवदान मिळाले.
नेमके काय घडले? मंगळवारी सायंकाळी वीर अनिल सरकटे हा मोटरसायकलवरून जात असताना बीड रोडवरील मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याची गाडी घसरली. डोक्याला व पायाला गंभीर मार लागून तो रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता.
कोठारी ठरले देवदूत अपघाताची माहिती मिळताच बालाजी आजबे आणि माऊली बांगर यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळवले. कोठारी यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली खाजगी रुग्णवाहिका घेऊन कार्यकर्ते दीपक भोरे आणि दिनेश भोगाडे यांना घटनास्थळी पाठवले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वीरला भोरे व भोगाडे यांनी तातडीने उचलून रुग्णवाहिकेत टाकले व जामखेड येथील रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीचे प्राथमिक उपचार केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, कोठारी यांच्या कार्यकर्त्यांनीच त्याच्या नातेवाईकांनाही तत्काळ निरोप दिला.
“हजारो जीव वाचवणारे कोठारी” संजय कोठारी हे ‘जामखेडचे १०८’ म्हणून ओळखले जातात. अपघात, नैसर्गिक आपत्ती, प्रसूती अशा कोणत्याही आणीबाणीच्या वेळी २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचे काम ते गेली अनेक वर्षे करत आहेत. आजपर्यंत त्यांच्या तत्परतेमुळे हजारो जणांचे प्राण वाचले आहेत.
“बीड रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा आणखी बळी जातील” अशी मागणी बालाजी आजबे यांनी केली.
जखमी वीरची प्रकृती आता स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वीरच्या कुटुंबीयांनी व नागरिकांनी संजय कोठारी, दीपक भोरे, दिनेश भोगाडे यांचे आभार मानले आहेत.
“रस्त्यावर पडलेल्या माणसाला उचलणे हीच खरी माणुसकी. प्रशासनाने खड्डे बुजवावेत, आम्ही जखमींना उचलत राहू” – संजय कोठारी, सामाजिक कार्यकर्ते